ताज्या घडामोडीपुणे

यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाने जारी केला पहिला अंदाज

पुणे |  प्रतिनिधी 

 ‘देशात यंदा सलग चौथ्या वर्षी पाऊस सरासरी गाठेल,’ असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केला. या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता असून, प्रशांत महासागरातील ‘ला निना’ स्थितीमुळे पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे.

‘आयएमडी’तर्फे विविध मॉडेलचा आधार घेऊन गुरुवारी मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर झाला. या अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या ९९ टक्के पावसाचे अनुमान असून, पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता सर्वाधिक ४० टक्के आहे. तसेच, विभागनिहाय अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत, विशेषतः मराठवाड्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. केंद्रीय भूविज्ञान सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. ‘आयएमडी’च्या ‘स्टॅटिस्टिकल मॉडेल’नुसार यंदा देशात जून ते सप्टेंबर कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यासाठी पाच टक्के कमी-अधिक त्रुटी गृहीत धरण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील देशातील मान्सूनच्या पावसाची सरासरी ८७० मिलीमीटर आहे. या वर्षी सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता १४ टक्के असून, सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पावसाची शक्यता २६ टक्के, ९६ ते १०४ टक्के पावसाची शक्यता ४० टक्के, १०४ ते ११० टक्के पावसाची शक्यता १५ टक्के, तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता पाच टक्के असल्याचे अंदाजात म्हटले आहे.

विभागनिहाय पावसाचे प्रमाण दर्शवणाऱ्या ‘प्रोबॅबलिस्टिक’ अंदाजानुसार महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असून, राज्यात इतरत्र तीच शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे. तेलंगण, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र, ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, हरियाणा, तमिळनाडू या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

‘ला निना’मुळे सरासरीची शक्यता

यंदा मान्सून काळात प्रशांत महासागरात ‘ला निना’च्या स्थितीची शक्यता असून, हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटक निगेटिव्ह राहण्याची शक्यता आहे. ‘निगेटिव्ह आयओडी’ भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करतो. मात्र, प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती सक्रिय असताना भारतात समाधानकारक पाऊस होतो, असे आकडेवारी सांगते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button