breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“दोन कोटींची जमीन दहा मिनिटांत तब्बल १८ कोटींना कशी घेतली?”; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप

अयोध्या |

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनांप्रमाणे केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन केला. नंतर या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिरांच्या कामाला सुरूवातही झाली आहे. दरम्यान, राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून आता ट्रस्ट भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. १० मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, याची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचं काम पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणीही केली आहे.

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने २ कोटी किंमत असणारी जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली. हे सरळ भ्रष्टाचाराचं प्रकरण असून सरकारने याची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टी सरकारमधील मंत्री आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही भ्रष्टाचाराचे असेच आरोप केले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत सिंह यांनी काही कागदपत्रे दाखवली. सिंह म्हणाले, ‘भगवान श्री राम यांच्या नावाने कोणताही घोटाळा आणि भ्रष्टाचार करण्याची कोणी हिंमत करेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण मी तुम्हाला जी कागदपत्रे दाखवणार आहे ती सरळ सरळ हेच सांगतील, की रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय जी यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे,” सिंह म्हणाले.

“दोन कोटी रुपयांत विकत घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखानं वाढत गेला. भारतच काय तर जगातील कुठल्याच जमिनीचा भाव इतक्या वेगानं वाढत नाही. हे उघडपणे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. मी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारकडे अशी मागणी करतो, की याप्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी. तसंच या गंभीर भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावं. हा प्रश्न देशातील करोडो राम भक्तांसह राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टानं कमावलेले पैसे मंदिरासाठी देणाऱ्यांच्या विश्वासाचाही आहे,” असंही सिंह यावेळी म्हणाले. “कोणत्याही ट्रस्टमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी योग्य बोर्डाचा ठराव असतो. केवळ पाच मिनिटांमध्ये हा प्रस्ताव राम मंदिर ट्रस्टने पारित कसा केला आणि तात्काळ जमीनही खरेदी केली? मला वाटते की श्री राम यांच्या भव्य मंदिराच्या नावाखाली देणगी देणाऱ्या कोट्यवधी भाविकांना खरोखर दु: ख झाले असेल. भगवान श्री राम यांच्या नावावर स्थापन झालेल्या ट्रस्टमधील ते जबाबदार लोक कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत,” असं सिंह म्हणाले.

सपाचे नेते पवन पांडे म्हणाले,”बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट विकली. काही मिनिटांत जमिनीचा भाव दोन कोटींहून १८.५ कोटी कसा होऊ शकतो. अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्ट विश्वस्त अनिल मिश्रांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. १७ कोटी तत्काळ खात्यावर जमा करण्यात आले. हे पैसे कुणी दिले आणि ते कुणाच्या खात्यात जमा करण्यात आले, याची सीबीआयने चौकशी करावी,” अशी मागणी पांडे यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, “अशा प्रकारच्या आरोपांना आपण घाबरत नाहीत. मी काही बोलणार नाही. आपल्यावर झालेल्या आरोपांचा अभ्यास करू. माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त निवेदनात राय म्हणाले, “आमच्यावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. आम्हाला आरोपांची भीती वाटत नाही. मी या आरोपांचा अभ्यास करुन चौकशी करीन,” असं राय यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button