TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

इशानवर सर्वाधिक बोली; चहर दुसऱ्या, तर श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महालिलावात शनिवारी २० कोटी रुपयांच्या महाबोलीची अपेक्षा फोल ठरली. परंतु झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन हा लिलावातील सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला. १५ कोटी, २५ लाख रुपये रकमेला मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान दिले.अष्टपैलू दीपक चहर (१४ कोटी) आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी) यांनी महागडय़ा खेळाडूंच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना संघात घेतले. सकाळच्या पहिल्या सत्रावर श्रेयसने लक्ष वेधले. मात्र लिलावाच्या दुसऱ्या सत्रात इशानला संघात कायम राखण्यासाठी मुंबईने सनरायजर्स हैदराबादशी कडवी लढत देत आकडा १५ कोटींपार उंचावला.

आकडय़ात चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंवर १० कोटी, ७५ लाख रुपयांची बोली लागली. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात सर्वाधिक बळी नावावर असणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कायम ठेवले आहे. मात्र ‘आयसीसी’च्या गोलंदाजीच्या क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने आश्चर्यकारक मुसंडी मारली. बंगळूरु संघानेच हसरंगासाठीही पटेलइतकेच पैसे खर्च केले. गतहंगामात चेन्नईचे प्रतिनिधत्व करणाऱ्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने प्राप्त केले, तर निकोलस पूरनला सनरायजर्स हैदराबादने संघात स्थान दिले.

राजस्थान रॉयल्सने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी ५ कोटी रुपये मोजले, तर डावखुऱ्या देवदत्त पडिक्कलला ७ कोटी, ७५ लाख रुपये बोलीसह प्राप्त केले. भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी सलामीवीर शिखर धवनसाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुजरात टायटन्सने ६.२५ कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्हो (४.४० कोटी), अंबाती रायुडू (६.७५ कोटी) आणि रॉबिन उथप्पा (२ कोटी) या खेळाडूंना कायम राखले.

परदेशी खेळाडूंपैकी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरला लखनऊ सुपरजायंट्सने ८.७५ कोटी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पंजाब किंग्जने ९.२५ कोटी, तर स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने ८.५ कोटींपर्यंत बोली उंचावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सलामीवीर आणि कर्णधारपद हे दोन्ही प्रश्न सोडवण्याच्या इराद्यााने फॅफ डय़ूप्लेसिसला ७ कोटी रुपयांना संघात स्थान दिले, तर क्विंटन डीकॉकला (६.७५ कोटी) लखनऊने स्थान दिले.

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, उमेश यादव आणि इशांत शर्मा या अनुभवी कसोटी क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशी लिलावात स्थान मिळाले नाही. परंतु रविवारी संघांनी उत्सुकता दर्शवली तरच या खेळाडूंचे भवितव्य ठरू शकेल. याशिवाय सुरेश रैना, डेव्हिड मिलर, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मॅथ्यू वेड, सॅम बििलग्स यांच्यावरही शनिवारी बोली लागली नाही.

मुंबई इंडियन्समध्ये परतल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. कौटुंबिक वातावरणामुळे माझे संघातील सर्वाशी ऋणानुबंधाचे नाते आहे. मी संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. – इशान किशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button