#Coronavirus: महात्मा फुले जन-आरोग्य योजनेंतर्गत आता सर्वांना उपचार!

मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शनिवारी घेण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी लोकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य १२० उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ९९६ आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत १२०९ आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास ८५ टक्के लोकांना या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र २३ मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे.
युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून ३१ जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील त्यातही मुंबईतील करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. त्यातच अनेक रुग्णालये बंद आहेत अथवा रुग्णांना उपचारासाठी नाकारले जाते हे लक्षात घेऊनच हा आदेश काढण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
करोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. महत्वाचे शासकीय रुग्णालयांत १२० आजारांवर उपचार घेण्यासाठीचे तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खाजगी रुग्णालयातही घेता येणार असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले तर ३१ जुलैपर्यंत या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज वाटल्यास या योजनेला मुदतवाढ दिली जाईल, असे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.