पुण्यातील कोरोना रुग्णाची प्रकृती ठणठणीत; रुग्णालयाकडून डिस्चार्ज, नवा व्हेरियंंट सौम्य स्वरुपाचा: वैद्यकीय तज्ञांचे मत

पुणे : २०१९ साली आलेल्या कोरोना (कोव्हिड १९) या आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पुणे शहरात एका ८७ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. याविषयी आता दिलासादायक बातमी समोर आली असून या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून त्याला रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे.
हेही वाचा – राज्यातील जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांत, चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय जोरदार
पुणे शहरातील एका ८७ वर्षीय पुरुष रुग्णाची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे या रुग्णावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आता रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याने रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरियंंट सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, योग्य ती काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचे सर्व सक्रिय रुग्ण असून ते वेगवेगळ्या परिसरातील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.