ताज्या घडामोडीपुणे

हृदयद्रावक! प्रेम प्रकरणातून तान्हुल्याची हत्या?

ताम्हिणी घाटात ६ दिवसाच्या बाळाला चौघा भावांनी निर्दयीपणे फेकून दिले

 पुणे | मुळशी-रायगड महामार्गावरील ताम्हिणी घाटात अवघ्या ६ दिवसाच्या चिमुकल्याला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. शनिवार दि.५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याचे पीडित महिलेने सांगितले. चुलत भावाच्या प्रेम प्रकरणातून जन्मलेल्या बाळाला, त्याच्यासह इतर ३ भावांनी ताम्हिणी घाटात फेकून देण्याचा निर्दयीपणा केला आहे. पीडित महिलेने रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याती आंबादास गावातून थेट पौड पोलीस स्टेशन गाठले. झालेली सर्व हकीकत तिने सांगितली असता हा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे.
मूळची आंबेत, ता.म्हसळा, जि. रायगडमधील रहिवासी असलेली मंगल पवार (वय २७ वर्ष) ही मजूर महिला घोटवडे, ता.मुळशी परिसरात राहत होती. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते व त्यापासून तिला एक ११ वर्षाची मुलगी होती. महिलेचे नात्यातील सचिन गंगाराम चव्हाण (मूळ रा.आंबादास, ता.खेड, जि.रत्नागिरी) याच्या सोबत सूत जुळल्याने त्याच्यासोबत ती शेळकेवाडी-गोडांबेवाडी परिसरात तिच्या मुलीसह राहत होती. सचिनपासून आलेल्या संबंधातून ३० जानेवारी रोजी महिलेने बाळाला जन्म दिला.
सचिनचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण ( तिघेही रा. आंबादास, ता.खेड, जि.रत्नागिरी) हे सचिनला पीडित महिलेसोबत राहू नकोस म्हणून सांगून घेऊन जात असत. मुलाला जन्म दिल्यानंतर ते आणखी खवळले. ४ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी महिला, तिची मुलगी व सचिन घरात असताना सचिनचे तिनही भाऊ येथे येऊन आपण आमच्या गावी जाऊन राहून म्हणून या तिघांना घेऊन गेले.
पौडमार्गे ताम्हिणी घाटातून जात असताना एका दरीपूल वळणाजवळ इंडिका गाडी (एम. एच. ०८ झेड. ४५९३) थांबवली. या चौघा भावांनीही सगनमत करून सहा दिवसाच्या बाळाला महिलेकडून ओढून घेतले. फिर्यादी महिला व मुलीस गाडीतच बसवून गाडी लॉक करून ठेवली. अर्ध्या-पाऊण तासाने हे चौघेही परत आले व आंबादास गावच्या दिशेने जावू लागले असताना महिलेने बाळा विषयी चौकशी केली. त्यावेळी महिलेला धमकी देत, “गप्प बस नाहीतर तर तुला व तुझ्या मुलीलाही दरीत फेकून देऊ” असे सुनावले. या चौघांनी या महिलेस व तिच्या मुलीस आंबादास येथे नेऊन डांबून ठेवले.
१० फेब्रुवारी रोजी सचिन व त्याच्या भावांनी या महिलेस शेळकेवाडी येथे जाऊन रहा, येथे अजिबात राहू नकोस म्हणून सोडून दिले. हि महिला आंबादासहून माणगाव व नंतर पौड पोलिस स्टेशन येथे आली. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पौड पोलिसांनी आंबादास येथे जाऊन या चौघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ताम्हिणी घाट परिसरात बाळाला टाकून दिलेल्या परिसरात बाळाचा शोध घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून बाळ न सापडल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पवन चौधरी तसेच आदरवाडी, निवे, डोंगरवाडी ग्रामस्थ व काही ट्रेकर्स या बाळाचा शोध घेत आहेत. बाळाच्या मृतदेहाचा शोध शिवदुर्ग टीमचे सुनील गायकवाड, समीर जोशी, हर्षल चौधरी, रतन सिंग, आदित्य पिलाने, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, दक्ष काटकर, सचिन वाडेकर, सुनिल गायकवाड, निलेश गराडे, शेलार मामा, राजेश गायकवाड यांच्या पथकाच्या सहकार्याने सुरू आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button