breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

…ते ऐकून पंतप्रधान मोदींची २ तासांची झोपही उडाली असेल; खासदार संजय राऊत यांचा टोला

मुंबई |

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दोन तास झोपतात. ती झोपही लागू नये आणि देशाची २४ तास सेवा करता यावी यासाठी ते प्रयोग करत आहेत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टोलेबाजी केली आहे. ही चमचेगिरीची हद्द आहे. असे चमचे कधी बघितले नाहीत, असं राऊत म्हणाले.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. भाजप आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवणारे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी आज, रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ”भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच ऐतिहासिक विधान केले आहे. या देशात, जगात दुसरे कुणीच काम करत नाहीत. ना बायडन, पुतीन, बोरिस, ना झेलेन्स्की…फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच २२ तास काम करतात. २४ तासांतील २२ तास काम आणि फक्त दोन तास त्यांना झोप मिळते, असे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. मोदींना जी २ तास झोप मिळते, तीही मिळू नये आणि २४ तास देशाची सेवा करावी, यासाठी प्रयोग सुरू आहेत, असे पाटील यांचे म्हणणे आहे. हे ऐकून पंतप्रधानांची खरोखरच दोन तासांचीही झोप उडाली असेल,” असा जोरदार टोला राऊत यांनी लगावला. ही चमचेगिरीची हद्द आहे. अशी चमचेगिरी या देशात कधीही बघितली नाही. असे चमचेही बघितले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

जोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा होत नाही, तोपर्यंत काश्मीर खोऱ्यात शांतता नांदणार नाही, असं विधान पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलं होतं. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मुफ्ती यांच्या म्हणण्यावर भाजपला काय वाटतं ते महत्वाचं आहे. कारण मुफ्ती यांचा पक्ष भाजपचा मित्रपक्ष होता. त्यांचा पक्ष पूर्वीपासूनच पाकिस्तानच्या बाजूने आहे. फुटीरतावाद्यांना मदत करणारा आणि पाकिस्तानला काश्मीरच्या चर्चेत ओढणारा, दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती दाखवणारा त्यांचा पक्ष आहे. तरीही भाजपने या पक्षासोबत युती केली आणि सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले. त्याच काळात लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी भाजप सरकारमधून का बाहेर पडला नाही? आता काश्मीर फाइल्सवर बोलतात, अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे असं बोलणाऱ्या त्याच मुफ्ती आहेत. हे पाप भाजपचं आहे. त्यांना ताकद देण्याचं काम भाजपनं केलं आहे. या सगळ्याला भाजप जबाबदार आहे, असंही राऊत म्हणाले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरही राऊत यांनी भाष्य केलं. पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली. ती होणारच होती. त्यात नवीन काय आहे, असं सांगतानाच, राऊत यांनी भाजपवर टीका केली. उद्या संसदेत जाणार आहे. महागाईविरोधात दिल्लीत रणनीती तयार करू, असंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button