वारंवार ‘वांझोटी’ म्हणत विवाहितेचा छळ
पिंपरी | प्रतिनिधी
पत्नीला वारंवार वांझोटी बोलून तिचा मानसिक छळ केला. तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणि कार आणण्याची मागणी केली. पतीच्या अनैतिक संबंधांना पत्नीने विरोध केला असता पतीने तिला शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार थेरगाव आणि राजस्थान येथे घडला.
पती नरेंद्र राकेश बुरट (वय 30, रा. चित्तोडगड राजस्थान), सासू (वय 50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने 20 डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 मार्च 2014 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि सासूने फिर्यादी विवाहितेस वारंवार वांझोटी बोलून पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडीची मागणी केली. फिर्यादी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण करत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्यासाठी फिर्यादी विवाहितेने पतीला विरोध केला. त्यावरून देखील पतीने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.