TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (सीईटीपी) भूमिपूजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका , एमआयडीसी, पीसीएमसी सीईटीपी फौंडेशन, एमपीसीबी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या विशेष सहकार्याने भोसरी येथे उभारण्यात येत असलेल्या सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे(सीईटीपी) आज भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे , सहाय्यक प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम एस कलकूटकी , एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर , एमसीसीआयए चे महासंचालक प्रशांत गिरबाने , पुणे मेटल फिनिशर्स असोसिएशन चे अध्यक्ष सतीश बनवट , पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव शहा, पालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे स्थानिक उद्योग संघटनांचे अधिकारी समारंभासाठी उपस्थित होते.

या प्रकल्पा संदर्भात माहिती देताना पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव शहा म्हणाले कि,
प्रकल्पाचा DPR तयार करण्याचे काम जानेवारी 2023 मध्ये सुरू झाले असून 3 ते 4 महिन्यांत पूर्ण होईल. सांडपाणी निर्मितीचे प्रमाण लक्षात घेता सुमारे 1 MLD च्या प्लांटची आवश्यकता यासाठी आहे. तथापि, तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर अंतिम क्षमतेचा निर्णय घेण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका एकूण प्रकल्प खर्चाच्या ६५ % भार उचलणार असून एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रकल्प खर्चामध्ये अनुक्रमे २० % आणि 5% योगदान देतील. तसेच, उद्योजक खर्चाच्या उर्वरित १०% वाटा उचलणार आहे. औद्योगिक कंपन्यांमधून टँकरमध्ये सांडपाणी संकलित केले जाईल. सांडपाणी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना CETP चे सदस्य होणे बंधनकारण असणार आहे. मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स हे CETP स्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि रचनात्मक सहाय्य करीत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जमीन आणि नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी चिंचवड हा औद्योगिक पट्टा महाराष्ट्र आणि भारतातील एक प्रमुख उत्पादन केंद्र आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात ४ हजारहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे १ हजार कंपन्यांमधील रासायनिक घातक सांडपाणी आणि कचरा निर्माण होतो. या कंपन्यांचे रसायन मिश्रीत सांडपाणी, कचऱ्याची कायदेशीर आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही. या परिस्थितीमुळे जमीन आणि जल प्रदूषण होत आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MCCIA) गेल्या काही दशकांपासून पाठपुरावा करत असून सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (CETP) स्थापनेबाबतची मागणी करण्यात येत होती.

यावेळी मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक करंदीकर म्हणाले कि, औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी, एमपीसीबी (MPCB) आणि उद्योग संघटना यांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये, PCMC अंतर्गत येत असलेल्या MIDC भागात कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला . त्यानुसार, एमआयडीसी कडून सुमारे 1.5 एकरचा भूखंड (प्लॉट क्र. T-188/1, MIDC, भोसरी) नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेड आणि ऑरेंज श्रेणीतील औद्योगिक युनिट्सचा संमती डेटा प्रदान केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मिलिंद वराडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पराग कुलकर्णी, विवेक राऊत, संदीप हातकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button