breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीयसंपादकीय विभाग

Ground Report: पिंपरी-चिंचवडमधील माजी-भावी आमदारांचा ‘झिरो परफॉर्मन्स’

लोकसभा निवडणुकीत सावध भूमिका : महायुती, महाविकास आघाडीत सूर गवसेना!

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात विधानसभेकरीता प्रमुख दावेदार असलेल्या इच्छुकांचा या निवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ अगदी ‘झिरो’ दिसला. विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना या दिग्गजांनी ‘रिस्क’ नको म्हणून सावध भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजुला घटक पक्षांतील इच्छुकांचे सूर जुळले नाहीत. त्याचा फटका मावळ, शिरुरच्या चारही प्रमुख उमेदवारांना बसणार आहे.

राज्यात ऑक्टोबर- २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा प्रयोग झाला असला तरी, विधानसभेत अशीच स्थिती राहील, याची शाश्वती नाही. परिणामी, माजी-भावी आमदारांनी बोटचेपी भूमिका घेतली. महायुती असो किंवा महाविकास आघाडीचा ‘ राजकीय धर्म’ कुणीच पाळला नाही. कारण, विधानसभेला एकमेकांच्या विरोधात प्रचार करावा लागला, तर आता जुळवून घेण्यात अर्थ नाही, असा इच्छुकांचा दावा आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघात चिंचवड ४९.४३ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी विधानसभेत ४८.२५ टक्के मतदान झाले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या भोसरी विधानसभेत ४९.४१ टक्के मतदानाची सरासरी आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील माजी व भावी आमदार म्हणून चर्चेत असलेल्या तीव्र इच्छुकांची कामगिरी सुमार राहीली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांना मोठी तयारी करावी लागेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

पिंपरीतील इच्छुकांचा प्रभाव अदखलपात्र…

पिंपरी विधानसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे, आरपीआयच्या चंद्रकांत सोनकांबळे यांनी प्रचारात पुढाकार घेतला. मात्र, महायुतीशी समन्वयाचा मोठा अभाव दिसला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांनी प्रयत्न केला. शिलवंत या प्रभागापुरत्या प्रभावी ठरल्या, तर चाबुकस्वार यांना विशेष लक्षवेधी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे विधानसभा इच्छुकांनी केलेला प्रचार दखलपात्र होता, असे चित्र नाही.

चिंचवड विधानसभेत सावळा गोंधळ…

चिंचवड विधानसभा मतदार संघातील इच्छुकांची लोकसभा निवडणूक प्रचारातील कामगिरी सुमार राहिली आहे. विधानसभेचे प्रमुख दावेदार असलेले भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी संघटनात्मक पातळीवर मोदी सरकारच्या योजना आणि विकासकामे प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रचार सभा किंवा रॅलीमध्ये भाषण अथवा एखाद्या मुद्यावर लक्ष वेधता आले नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचा प्रचारातील टक्का नगण्यच होता. महायुतीची या मतदार संघात मोठी ताकद असतानाही प्रचारात एकसंघपणा दिसला नाही. भाजपामध्ये असलेले चार गट आपआपआल्या परीने काम करीत होते. विधानसभा निवडणुकीचे दुसरे प्रमुख दावेदार शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच भूमिका घेतली. शेवटपर्यंत कलाटे कुणाचा प्रचार करणार ही बाब गुलदस्त्यात राहिली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी शिरुर, मावळ आणि बारामती अशा तीन मतदार संघात पक्षकार्याला वेळ दिला. पण, चिंचवडमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही.

भोसरी विधानसभेत बलाढ्य विलास लांडेसुद्धा सावध…

‘बारा गावे दुसरी…एक गाव भोसरी’ अशी म्हण प्रचलित आहे, त्याचाच अनुभव लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख इच्छुकांनी सोईनुसार एकमेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. त्याची प्रचिती दि. ४ जूनच्या निकालात येणार आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी संपूर्ण प्रचारात एकही भाषण कुठे केल्याचे ऐकीवात नाही. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना स्वपक्षाचे उमेदवार असतानाही दोन-तीन कार्यक्रमांचे सोपस्कार वगळता ग्राऊंडवर प्रभाव दिसला नाही. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी त्या-त्या प्रभागात प्रभाव ठेवला. पण, संपूर्ण मतदार संघात त्यांना लक्षवेधी कामगिरी करता आली नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून एकही प्रभावी स्थानिक नेता या मतदार संघात कार्यरत नव्हता. महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपामध्ये ‘आडवा-जिरवा’चा खेळ झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button