breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

Ground report: पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान आमदारांनी ‘महायुती धर्म’ जपला!

श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव यांच्या विजयासाठी कर्तव्यनिष्ठा

चिंचवड, पिंपरी आणि भोसरीतील मताधिक्याचे मिळणार राजकीय ‘मायलेज’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमधील चारही विद्यमान आमदारांनी ‘महायुती धर्म’चे पालन केले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी ‘कर्तव्यनिष्ठा’ दाखवली. त्यामुळे महायुतीच्या ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’मध्ये विद्यमान आमदारांना ‘ग्रीन’ शेरा मिळाला आहे. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमानांने तिकीट जवळपास निश्चित मानले जाते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

लोकसभा निवडणुकीकरीता मावळ आणि शिरुरमध्ये दि. १३ मे रोजी मतदान पार पडले. मावळमध्ये एकूण ५४.८७ टक्के मतदान झाले. तर शिरुरमध्ये ५४.१६ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीकरीता तीव्र दावेदार असलेल्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

विशेष म्हणजे, शहरातील तीनही विधानसभा मतदार संघात महायुतीचे वर्चस्व आहे. शहरातील चारपैकी तीन आमदार भाजपाचे आणि एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीची ताकद संख्यात्मकदृष्टया जास्त आहे.

मावळमधील चिंचवड विधानसभा मतदार संघात विद्यमान भाजपाच्या अमादार अश्विनी जगताप यांनी श्रीरंग बारणे यांच्या मताधिक्यासाठी मतदार संघात पूर्ण ताकदीने प्रचार केला. त्याला भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संघटनात्मक ताकदीची जोड मिळाली. या मतदार संघात २ लाख ६ हजार ९५९ म्हणजे ५५. ४२ टक्के मतदान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सभा, रॅलीमध्ये जगताप यांनी सहभाग घेतला. या निवडणुकीत ‘‘हिच ती वेळ… लक्ष्मण भाउंच्या विरोधकाला पाडण्याची..’’ अशा प्रकारची बॅनरबाजी झाली. त्यावेळी आमदार जगताप यांनी महायुती आणि बारणे यांच्या समर्थनार्थ रान पेटवले. चिंचवडमध्ये बारणे आघाडीवर राहिल्यास त्याचे श्रेय जगताप यांना सर्वाधिक राहणार आहे.

दुसरीकडे, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी बारणेंच्या प्रचारसाठी पुढाकार घेतला. सुरूवातीला मावळ मतदार संघ राष्ट्रवादीसाठी सोडावा आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना तिकीट द्यावे. या करिता बनसोडे आग्रही होते. मात्र, तिकीट वाटपानंतर अजित पवार यांचा निर्णय अंतिम अशी भूमिका घेत बनसोडे यांनी बारणेंच्या प्रचारासाठी सुरूवात केली. पिंपरीतील मताधिक्य ठेवण्यासाठी बनसोडे यांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावली. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पिंपरीतील असल्यामुळे महायुतीच्या या मतदार संघात सर्वाधिक ‘फोकस’ केला होता. विद्यमान आमदार म्हणून बनसोडे यांनाही त्याचा फायदा झाला.

दरम्यान, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनीही महायुतीचे उमेदवार बारणे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण शहरात प्रचारासाठी दौरा केला. सभा, बैठका आणि बूथ प्रमुखांशी संपर्क ठेवला. भाजपाची संघटनात्मक ताकद महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी जमेची बाजु ठरली. याउलट, महाविकास आघाडीकडे सहानुभूती आणि भाजपा विरोधी मतदाना टक्का या दोन बाबी हिताच्या ठरल्या. पण, बूथ यंत्रणा आणि प्रचार नियोजनात महाविकास आघाडीचा विस्कळीतपणा दिसला.

भोसरीत महेश लांडगे ‘फायर मोड’वर!

शिरुरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील असा चुरशीचा सामना झाला. सुरूवातील कोल्हे आघाडीवर वाटत होते. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटील यांनी वातावरण निर्मिती केली. भोसरीतील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी जनसंवाद बैठकांचा धडाका लावला. तसेच, महायुतीकडून ‘‘१ लाखाचे मताधिक्य देणार..’’ असा दावा केल्यामुळे आढळराव पाटील यांना भोसरीत दिलासा मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली वादळी पावसातील सभा चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात ‘फायर मोड’वर असलेले महेश लांडगे यांचे विधानसभेतील महायुतीचे तिकीट मात्र ‘फिक्स’ झाले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये रस्सीखेच…

महाविकास आघाडीतून पिंपरीमधील इच्छुक माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी संजोग वाघेरे यांच्या प्रचारसाठी कंबर कसली. तसेच, चिंचवडमधील शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी प्रचारात सहभाग घेतला. तसेच, भोसरीतून माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सक्रीयपणे सहभाग घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये रस्सीखेच पहायला मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button