TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

ग्राउंड रिपोर्ट : अजितदादांनी मनाचा मोठेपणा दाखवावा !

  • सहानुभूती मिळवण्याची संधी : पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पण, अजितदादांनी चिंचवडसाठी मोठेपणा दाखवावा, अशी पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे तब्बल ३५ वर्षे योगदान राहीले आहे. सुरवातील काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी आणि २०१४ पासून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर विकासकामांमध्ये कोणतेही पक्षीय राजकारण न करता जगताप यांनी अनेकांना मदत केली आहे.

विशेष म्हणजे, पवार आणि जगताप कुटुंबीय यांचा सलोखा कायम राहीला आहे. राजकीयदृष्टया मतभेद असले, तरी कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे. त्यामुळे अजित पवार जगताप कुटुंबाबत संवेदनशीलपणे निर्णय घेतील, असे वाटत होते. परंतु, पवार यांनी लोकशाही आहे. निवडणूक बिनविरोध होण्याचा संबंध काय? लोक ज्यांना पाहिजे, त्यांना निवडून देतील, अशी कठोर भूमिका घेतली.

वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. किंबहूना, आज शहराची प्रगती दिसत आहे. ते निश्चितच अजितदादांमुळेच यात तिळमात्र शंका नाही. चिंचवडची पोटनिवडणूक अवघ्या दीड वर्षांकरिता होणार आहे. या परिस्थितीत अजित पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादीला सहानुभूती मिळणार असून, अजित पवारांची राजकीय प्रगल्भता अधोरेखित होणार आहे. याचा फायदा आगामी महापालिका आणि विधानसभासह लोकसभा निवडणुकीत होणार आहे.

२०१९ साली अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी स्थानिक आणि बाहेरचा असा वाद निर्माण करण्यात आला होता. त्याचा फटका पार्थ यांना बसला. पण, आता स्थानिक विरोधी पक्षाच्या नेत्याच्या निधनानंतर राजकीय सुसंस्कृतपणा आणि सहवेदना दाखवण्याची आणि पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांच्या डोळ्यांत अंजन घालण्याची संधी अजित पवारांकडे आहे. याचा फायदा पार्थ यांच्या निवडणुकीत होवू शकतो किंवा स्थानिकांना केलेल्या चुकीची जाणीव होवू शकते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
विशेष म्हणजे, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत वेगळा विचार करावा. कारण, कसबा मतदार संघात टिळक कुटुंबियांमधील उमदेवार भाजपाने दिलेला नाही. पण, चिंचवडमध्ये दिवंगत जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शंकर जगताप उमेदवार असते, तर राष्ट्रवादीचा लढण्याचा निर्धार रास्त होता. आता जगताप यांच्या पत्नी म्हणून अश्विनी यांच्याबाबत राष्ट्रवादीने सहानुभूतीपूर्वक विचार करुन राजकीय प्रगल्भता दाखावावी, अशी स्थानिकांसह मतदारांची भावना आहे.

भाजपाने केले म्हणून नव्हे, जगताप कुटुंबियांसाठी पुढाकार घ्या…
पंढरपूर आणि देगलूर मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असा पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे. पण, भाजपाच्या चुकीच्या निर्णयांचे पडसाद मतदार निश्चितपणे मतरुपी कृतीतून दाखवतील. पण, चिंचवडमधील परिस्थिती वेगळी आहे. भाजपाने चूक केली म्हणून राष्ट्रवादीने करावी, अशी भूमिका अयोग्य आहे. जगताप कुटुंबीय म्हणून अजित पवार याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचीही हिच भावना आहे. याहून पुढे ही निवडणूक लागलीच, तर राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांमधील मोठा गट अश्विनी जगताप यांना सहकार्य करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button