Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रोहित पक्ष्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली ; जीपीएसमुळं समोर आली ठोस माहिती

मुंबई: मुंबईमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रोहित पक्ष्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती. यातील चार रोहित पक्ष्यांनी मुंबईतून गुजरातच्या दिशेने प्रवास केला असून दोन पक्षी अजूनही मुंबईत आहेत. यातील लेस्टर नावाच्या रोहित पक्ष्याने २१ जुलै रोजी संध्याकाळी मुंबईतून प्रवास सुरू केला आणि २२ जुलै रोजी रात्री गुजरातमधील कच्छच्या छोट्या रणामध्ये प्रवास थांबवला. या ५०० किलोमीटरच्या प्रवासासाठी त्याला २५ तासांचा कालावधी लागला. या प्रवासादरम्यान त्याने थांबून विश्रांतीही घेतली. या पक्ष्यांच्या प्रवासमार्गाची माहिती मिळाल्याने हे पक्षी कुठे थांबतात, तिथे उपलब्ध असलेल्या पाणथळ जागांची भविष्यातील सुरक्षितता, मुंबईमधील त्यांचा वावर, त्या दृष्टीने मुंबईतील पाणथळ जागांचे संरक्षण याचीही माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे.

असा केला प्रवास

– लेस्टर नावाचा रोहित पक्षी अजून पूर्ण प्रौढ पक्षी नाही. त्याने भांडुप पंपिंग स्टेशन येथून प्रवासाला सुरुवात केली आणि किनारा मार्गानेच पुढचा प्रवास केला.

– रात्री ९.२९ वा. त्याने प्रवासाला सुरुवात केली. गुजरातमध्ये नर्बड येथे सकाळी ६.३०ला त्याने पहिली विश्रांती घेतली. ही विश्रांती सुमारे ११.३३ तासांची होती.

– लेस्टरचा प्रवास त्याच्या आधी हुमायून नावाच्या रोहित पक्ष्याच्या मार्गाप्रमाणेच होता, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (बीएनएचएस) उपसंचालक राहुल खोत यांनी दिली.

– जीपीएस यंत्रणा बसवलेल्या रोहित पक्ष्यांना बीएनएचएसने लेस्टर, मॅककॅन, सलीम, हुमायून, नवी मुंबई आणि खेंगर्जी-३ अशी नावे दिली आहेत.

नेमकी माहिती समोर

– जीपीएस बसवल्याने हे पक्षी मुंबईतून नेमके कधी जातात याबद्दलची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत याबद्दल केवळ अंदाज वर्तवले जात होते.

– पाऊस सुरू झाला की रोहित पक्षी गुजरातमध्ये निघून जातात असे मानले जायचे. मात्र लेस्टर निम्मा पावसाळा संपत आला तरी इथेच होता. त्यामुळे आता अधिक ठोस माहिती समोर आली आहे.

– हुमायून त्याच्या प्रवासमार्गामध्ये वसईजवळील पाणथळ जागी थांबला होता. त्यामुळे आता ही पाणथळ जागा कशी आहे, किती सुरक्षित आहे याचाही अभ्यास येत्या काळात करता येणार आहे.

अनेक बाबी समोर येतील

– जीपीएस बसवलेले दोन रोहित पक्षी अजूनही मुंबईत आहेत. त्यांच्या प्रवासावरूनही अनेक बाबी समोर येतील.

– या पक्ष्यांना जोडीदार मिळाला आहे का, आजारी रोहित पक्षी मुंबईत राहतात का, त्यांना जोडीदार मिळण्याची शक्यता कमी असते का अशा बाबींचाही येत्या काळात अभ्यास करता येईल.

– जीपीएस बसवलेले हे पक्षी जेव्हा पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास करतील तेव्हा आणखी बाबी स्पष्ट होतील, असेही खोत यांनी सांगितले.

अशी असते जीपीएस यंत्रणा

– जीपीएस यंत्रणा काडेपेटीएवढी लहान असते. मोबाइल नेटवर्कच्या आधारे तिचे काम चालते.

– त्यावर सोलर पॅनल बसवलेले असतात.

– पक्ष्याचा उडण्याचा वेग, दिशा, उंची, तापमान अशा गोष्टींची माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून मिळत राहते.

– ही यंत्रणा दर चार-पाच तासांनी जवळच्या मोबाइल टॉवरकडे ही माहिती पाठवते आणि मग ही माहिती अभ्यासकांपर्यंत पोहोचते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button