TOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजन

संगीत मैफलला चांगला प्रतिसाद : भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे: ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पं.सी.आर.व्यास यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित संगीत मैफलीला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार, दि.२० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही मैफल झाली. कलावर्धिनी फाउंडेशन,ऋत्विक फाऊंडेशन आणि वसंत ठकार फाऊंडेशनच्या सहकार्याने या मैफलीचे आयोजन करण्यात आले .या मैफलीत पं.विभव नागेशकर यांचे तबलावादन आणि पं.सुहास व्यास यांचे गायन झाले. पं.नागेशकर यांना निलय साळवी यांनी लेहरा संगत केली.पं.व्यास यांना भरत कामत(तबला),सुयोग कुंडलकर(हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पं. विभव नागेशकर यांचे एकल तबलावादन झाले, यात त्यांना संवादिनीवर निलेश साळवी यांनी तर तबल्यावर त्यांचे शिष्य अक्षय फडणीस यांनी साथसंगत केली.पंडित नागेशकर यांनी प्रथम ताल तीन ताल सादर केला, त्यानंतर त्यांनी तुष्ण जातीची बंदिश, पारंपरिक बंदिशी तसेच पखवाजची बंदिश यांचे बोल गाऊन , त्यावर आपले एकल तबलावादन केले, पं. नागेशकर यांच्या तबलावादनाला जाणकार श्रोत्यांनी उत्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. सुहास व्यास यांचे गायन झाले, त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर तर तबल्यावर भरत कामत यांनी साथ केली, तसेच तंबोर्यावर पंडितजींचे शिष्य केदार केळकर आणि निरज गोडसे यांनी केली.पं. व्यास यांनी प्रथम पूर्वकल्याण हा राग सादर केला, हा राग पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांनी कर्नाटक पद्धतीतून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणला. रातांजनकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याज खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालय)चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.
या रागानंतर पं. व्यास यांनी राग केदार सादर केला, या दोन्ही राग गायनाला उपस्थित जाणकार आणि कानसेन श्रोत्यांनी उत्फूर्त दाद दिली. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४६ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
पं.सी.आर. व्यास :कल्पक संगीतकार, गायक, गुरू
कल्पक संगीतकार, गायक, गुरू म्हणून पं. सी.आर. व्यास(१९२४ – २००२) प्रसिद्ध होते. त्यांनी विविध रागात २५० हून अधिक बंदिशी ‘गुणीजान ‘ हे टोपण नाव घेऊन रचल्या.घराण्याच्या सीमा ओलांडून त्यांच्या रचनांनी प्रवास केला आणि देशभरातल्या विविध महोत्सवांमध्ये वेगवेगळ्या घराण्याच्या गायकांनी त्यांच्या बंदिशी आळवल्या.अभिजात शास्त्रीय संगीताच्या साधकांना व्यासपीठ मिळावे व त्याचा प्रसार व्हावा या हेतूने त्यांनी गुरुंच्या स्मरणार्थ ‘गुणिदास संगीत संमेलन’ ची सुरवात १९७७ पासून केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button