TOP Newsमहाराष्ट्रराजकारण

गोवा निवडणूक : भाजपा आमदार महेश लांडगे आता गोवा मोहीमेवर !

– विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवसांकडून मोठी जबाबदारी

– म्हापसा विधानसभा मतदार संघात लांडगेंनी तळ ठोकला

पिंपरी । प्रतिनिधी

गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. गोव्याची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र असले तरी भारतीय जनता पार्टीला आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपाने गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. फडणवीस यांनी त्यांची गोवा टीम तयार केली असून त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचाही समावेश आहे. आमदार महेश लांडगे यांच्यावर म्हापसा या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा जे पी नड्डा यांनी मागील महिन्यात गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवा प्रभारी म्हणून नेमण्यात आले. फडणवीस यांच्याकडे गोव्यात भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने फडणवीस यांनी देखील आपली टीम तयार केली आहे. संघटन कौशल्य, नेतृत्व आणि अन्य गुणांच्या आधारावर महाराष्ट्रातील काही नेत्यांची निवड ‘फडणवीस टीम’ मध्ये होणार आहे.

गोवा निवडणुकीसाठी फडणवीस टीम सज्ज आहे. गोव्यात 40 मतदारसंघ आहेत. फडणवीस टीममध्ये प्रत्येकाकडे एकेका मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. सुरुवातीला फडणवीस यांनी मावळचे माजी आमदार बाळा उर्फ संजय भेगडे यांना आपल्या टीममध्ये घेतले आणि त्यांच्याकडे साकोली मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली. साकोली मतदार संघातून गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निवडणूक लढवत असून त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी बाळा भेगडे यांच्यावर देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा टीममध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा देखील समावेश झाला आहे. महेश लांडगे यांच्यावर म्हापसा या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. म्हापसा हा गोव्याच्या दृष्टीने महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली असल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी (दि. 14) आमदार महेश लांडगे यांनी म्हापसा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला. त्यांनतर शनिवारी (दि. 15) त्यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याशी पणजी येथे चर्चा केली.

आमदार महेश लांडगे यांनी गोव्यात आपला तळ ठोकला आहे. पुढील आठवड्यात ते समन्वय बैठका घेणार आहेत. त्यामध्ये प्रचार आणि निवडणुकीबाबत ते संबंधितांना सूचना देणार आहेत. म्हापसा मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्यानंतर या संपूर्ण तयारीला आणखी वेग येणार आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी व आमच्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू असे आमदार महेश लांडगे म्हणाले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे गोव्यात फिजिकली प्रचार करण्यावर बंधने आहेत. त्यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगवर सध्या भाजपचा भर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button