breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज ठाकरे स्वत:च्या पक्षाचं काम करताहेत पाहून आनंद वाटला, जयंत पाटलांचा खोचक टोला

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट नवनिर्माण सेनेने आता पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने स्वतः पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षबांधणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी सकाळी ते नागपुरात पोहोचले. त्यांच्या या दौऱ्याला मनसेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना बारीक चिमटा काढला. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील वेगळ्या भागात फिरत आहेत, हे चांगल आहे. सगळीकडे जाऊन ते पक्ष स्वतःचा वाढवतील अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या पक्षाचं काम न करता ते स्वतःच्या पक्षाचं काम करत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, अशी खोचक टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढली आहे. भाजपचे अनेक नेते हे कृष्णकुंज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत.तर अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.राज ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभा, ठाण्यातली सभा, आणि औरंगाबादच्या सभे मध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या सभेनंतर महाविकास आघाडीकडूनही त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. राज ठाकरे हे सभेमध्ये भाषण करताना भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मनसैनिकांनी मोठे रान उठवले होते. मनसेचा अयोध्या दौराही ठरला होता. मात्र, खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधामुळे हा दौरा बारगळला होता. त्यानंतर राज ठाकरे पायाच्या शस्त्रक्रियेमुळे काही काळ राजकारणापासून दूर होते. मात्र, आता तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज ठाकरे पक्ष बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी साडे आठ वाजता राज ठाकरे यांचं नागपूरमध्ये आगमन झालं. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. राज ठाकरेंच्या स्वागताला नागपूर रेल्वे स्टेशनला शेकडो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं स्वागत केलं गेलं. राज ठाकरेंनीही शेकडो कार्यकर्त्यांना अभिवादन करुन त्यांचा मानपान स्वीकारला. कामात मागे पडू नका, जोरदार काम करा, अशा सूचना त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याजवळ जे काही शिल्लक दिवस आहे, त्या दिवसांत प्रचंड काम करा. घराघरात पोहोचा. पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button