breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

२४ तासांत कामावर हजर व्हा! रोजंदारीवरील ३५० एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई |

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सामिल झालेल्या रोजंदारीवरील ३५० हून अधिक एसटी कामगारांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४ तासांत कर्तव्यावर रुजू न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. राज्यात आतापर्यंत ७ हजार ६२३ एसटी कामगार पुन्हा कामावर परतले असून ८४ हजार ६४३ कर्मचारी प्रत्यक्षात संपात सामिल झाले आहेत. कामावर परतलेल्यांमध्ये प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचाऱ्यांबरोबरच २९५ चालक आणि १३६ वाहक आहेत. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अद्याप कमीच असून निलंबनाची कारवाईही केली जात आहे.

या संपात रोजंदारीवरील कर्मचारी असून त्यांनाही कामावर परतण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. हे कर्मचारी न परतल्याने त्यांच्यावर सेवा समाप्तीच्या कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यात सध्या सुमारे २ हजार रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक, वाहकही आहेत. सेवा समाप्तीची कारवाई करण्यापूर्वी मंगळवारी राज्यातील ३५० हून अधिक रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बेकायदेशीररित्या संपात सहभागी झाला असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे.

आपल्या नियोजित कर्तव्याच्या ठिकाणी २४ तासांच्या आत हजर राहून कर्तव्य सुरु करावे, अन्यथा आपली नेमणूक तात्पुरत्या वेतनश्रेणी स्वरुपाची असून ती आपणास कोणतीही पूर्व सूचना न देता केव्हाही संपुष्टात येईल. आपण अटींचा भंग केल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

* बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यात फक्त १३ एसटी गाडय़ा सुटतानाच त्यातून २८२ प्रवाशांनीच प्रवास केला होता.

* सायंकाळी चार वाजेपर्यंत सुटणाऱ्या बसगाडय़ांची संख्या ५६ पर्यंत पोहोचली. तर एकूण प्रवासी संख्या ८२४ होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button