breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सव 2022 ः नवसाला पावणारा “लालबागचा राजाचे” गूढ रहस्य…

तुम्हाला माहितीय सर्वात पहिला नवस काय होता?… प्रत्येक नवस कसा काय पूर्ण होतो..जाणून घ्या हा इतिहास..

मुंबई । महान्यूज

नवसाला पावणारा गणपती असा नावलौकिक प्राप्त असणाऱ्या लालबागच्या राजाबद्दल जवळपास सर्वांनाच ओळखीचा आहे, लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला असंख्य लोक दरवर्षी गर्दी करतात. पण लालबागच्या राजाचा इतिहास? त्याच नवसाला पावणारा गणपती हे नाव कस पडलं याचं कुतूहल बऱ्याच जणांच्या मनात असते. तो नवस काय होता की तिथून पुढे या राजाचा नावलौकिक तसा झाला. हे सविस्तर तुम्ही इथे नक्की जाणून घ्या. लालबागच्या राजाची ही गोष्ट आहे इसवी सन 1932 सालची ! मुंबईतील लालबाग परळ परिसरातील. तेव्हा मुंबईला बॉम्बे या नावानं विशेषतः ओळखलं जायचं. हे शहर इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. देशातील इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त व्यापार आणि उद्योग या एकट्या मुंबईत व्हायचे.

मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली पेक्षाही वरचढ होती. समुद्र किनारा जवळ असल्यामुळे या शहराचा ब्रिटिशांना चांगलाच फायदा झाला. या काळात मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले. मोठमोठे कारखाने बांधले गेले. संपूर्ण शहराच स्वरूपच बदललं होतं आणि या सर्वात अजून एक क्षेत्र पुढे आलं ते होतं टेक्स्टाईल मिल्स म्हणजे कापड गिरण्या.

लालबाग परळ या भागात अनेकांनी या गिरण्या बांधल्या होत्या, त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आणि या गिरण्यांमध्ये काम करणारे कामगार वर्गातील लोक लालबाग जवळील परिसरात स्थायिक झाले. त्यामुळे या भागात लोकांच्या वस्त्या आणि चाळी मोठ्या प्रमाणात वाढल्या. मुंबईचा झपाट्याने होत असणारा विकास पाहता येथे जागेची कमतरता भासू लागली म्हणूनच त्या काळातील इंग्रज सरकारने लालबाग येथे असणारी पेरू चाळ आणि तिच्या बाजूच मार्केट हटवून तेथे नवीन कारखाना सुरू करायची योजना केली होती. तेथे असणाऱ्या या मार्केटमध्ये मासे विक्री करणाऱ्या लोकांसमोर जागेचा प्रश्न निर्माण झाला ! आपण यासाठी काय करावे, हे त्यांना कळत नव्हते. या काळात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरला होता.

त्यामुळे लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण झाला होता आणि सार्वजनिक उत्सवात एकत्र येण्याची संधी मिळत होती, तीथे सुद्धा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन झालेली होती. अशातच लालबाग मधील मासे विक्री करणारे लोक एकत्र येऊन त्यांनी गणपतीला साकडं घातलं की आम्हाला आमच्या बाजारासाठी हक्काची जागा भेटू दे आणि यासाठी या सर्व लोकांनी प्रयत्न करायला सुरुवात केले, त्यांना तिथल्या व्यापारी आणि इतर प्रतिष्ठित लोकांनी मदत केली आणि पाहता पाहता एका वर्षातच त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. मासे विक्री करणाऱ्या लोकांना आणि इतर दुकानदारांना त्यांच हक्काचा मार्केट भेटलं. असा हा पहिला लालबाग भागातला पहिला नवस पूर्ण झाला आणि यातून आनंदित होऊन या लोकांनी त्याच मार्केटमध्ये त्याच वेळी 1934 साली गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव सुरू केला. गणपतीच दर्शन घ्यायला येणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली असून तिला वेगवेगळे नवस लोक करतात आणि ते नवस पूर्ण देखील होतात अशी श्रद्धा आहे.

यामागे गणपती वरची श्रद्धा म्हणा किंवा भक्ती म्हणा पण इथे केलेला कोणताही नवस नक्कीच पूर्ण होतो. यामागचे रहस्य कोणालाही सांगता येत नाही. जो व्यक्ती गणपती बाप्पा वर खरी श्रद्धा ठेवून येथे येतो त्याची इच्छा ही पूर्ण होतेच. पाहता पाहता हा लालबाग गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख घटक बनला होता. लालबागचा गणपती म्हणून लोक या गणपतीला लालबागचा राजा म्हणू लागले. लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा लालबागचा राजा. गणपतीची मूर्ती विविध स्वरूपामध्ये साकारली जाते. एका वर्षी हा गणपती मासेमारांच्या होडीमध्ये विराजमान झालेला दाखवला.

एका वर्षी श्रीकृष्णाच्या स्वरूपात मूर्ती बनवली गेली, 1946 साली श्रींची मूर्ती नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या रूपात साकारली गेली होती. लालबागचा गणपती आणि गणपती भोवती असणारा देखावा हे आकर्षणाचे केंद्र झाले होते. हळूहळू या मूर्तीची उंची देखील वाढवण्यात आली. सध्या स्थापन केली जाणारी मूर्ती जवळपास वीस फूट उंच असते. दरवर्षी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात. गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये दररोज एक ते दीड लाख लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. गणेश मूर्तीचे निर्माण त्याच ठिकाणी केला जातो. मूर्ती बनवण्याची सुरुवात गणपतीच्या पायापासून केली जाते आणि त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो.

गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये अनेक मोठ मोठे सेलिब्रेटी , खेळाडू, कलाकार आणि नेतेमंडळी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. ह्या काळात विशिष्ट पोलीस पथक आणि सुरक्षा रक्षकांची समितीही येथे कार्यरत असते. दर्शन घेण्यासाठी मोठमोठी रांग लागलेली असते. नवसाच्या रांगेत तर लोक पंधरा-सोळा तासांहून अधिक वेळ उभे असलेले पाहायला मिळतात. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक एखादा राजाला शोभेल अशीच असते. दुपारी लालबाग येथून निघालेली विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीला पोहोचायला दुसरा दिवस उजाडतो. लालबागचा राजाचे विसर्जन पाहण्यासाठी हे लोक हजारोंच्या संख्येने येतात.

(मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महाईन्यूजवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज https://mahaenews.com/ वर.)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button