breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयगणेशोत्सव-२०२३

गणेशोत्सव 2022 ः गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, ३ हजार ५०० गाड्या कोकणात जाणार

मुंबई । महान्यूज ।

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या विघ्नाला न जुमानता मुंबई, ठाण्यातील चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणाकडे रवाना होण्याच्या तयारीत असून गणेशभक्तांचा प्रवास सुखाचा करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळात जवळपास ३ हजार ५०० एसटी बसेस कोकणात धावणार आहेत.

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती स्पेशल जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या फुल झाल्या आहेत. यापैकी १ हजार ९५१ गाड्यांना ग्रुप बुकिेंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. दरम्यान, एसटीच्या जादा गाड्यातून कोकणकडे रवाना होणाऱ्या कोकणवासियांना चन्ने यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. गणपती आणि कोकणातील चाकरमान्यांचे एक अतुट नाते बनले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणकडे रवाना होत आहेत. गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करते. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २ हजार ५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना सुरुवात झाली असून जादा गाड्यांची माहितीचन्ने यांनी दिली.

चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत तब्बल ३ हजार ४१४ गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे दीड लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. कोकणातील चाकरमान्यांचे आणि एसटीचे ऋणाणूबंध कायम आहेत. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या लालपरीला सुरक्षित प्रवास म्हणून प्राधान्य दिल्याने शेखर चन्ने यांनी चाकरमान्यांचे मनापासून आभार मानले.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित तसेच सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती चन्ने यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button