breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीलेख

गणेशोत्सव-२०२२ : गणरायाचे ‘’विश्वचक्षु’’ साकारणारी प्रतिभासंपन्न मूर्तीकार!

कलाकाराला वय, लिंग, जात पात कशाचेच बंधन नसते. कलेची साधना करणारा प्रत्येकजण कलाकार असतो. मूर्तीकला हा कलेतील महत्त्वाचा प्रकार. पिढीजात आलेली मूर्तीकला परंपरेने चालत आलेली असते. पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या या मूर्तीकलेत आता महिलाही पारंगत झाल्या आहेत. महिलांनी प्रथा परंपरेच्या चौकटी मोडत समाजाला शिक्षित करत नवा इतिहासच रचलायं. मग महिला या मूर्तीकलेत मागे कशा राहतील. सर्व क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवत असलेल्या महिला मूर्तीकामातही आपले कसब दाखवतायत. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात दोन महिला मूर्तीकार कलेची साधना करत गणरायाचे चक्षू रेखाटतं मूर्तीत जिवंतपणा आणतायत.

  • अमृता ओंबळे, लेखिका, मुक्त पत्रकार, पुणे.

गणरायाचे ते साजिरे रुप अगदी पाहिल्याक्षणी मनात भरते.. गणरायाचे आभूषण, त्याचे लोभसवाणे नयन, त्याचा तोरा दाखवणारा मुकूट, त्याचे भक्ताप्रतीचे उत्कट भाव हे सार त्याच्या मूर्तीत दिसतं. गणरायाची मूर्ती पाहिली की प्रथम आपल लक्ष जातं त्याच्या डोळ्यांकडे. विश्वाचा ठाव घेणारे त्याचे विश्वचक्षू अगदी पाहताक्षणी मनात भरतात. त्या मूर्तीत जिवंतपणा असल्याची जाणीव करुन देणारे ते चक्षू म्हणजे त्या मूर्तीकाराचीच किमया असतात.

कोणतीही कलाकृती घडवताना कलाकाराला त्या कलेशी अगदी एकरुप व्हावे लागते. तेव्हाच त्याच्या मनातली ती कला मूर्त रुपात येते. कलाकाराला एकतानता असली की कलाकृती सुरेख घडते. असं म्हणतात की कोणाताही कलाकार जन्मतो तेव्हा तो ईश्वराकडून काहीतरी अधिक घेऊन पृथ्वीवर येतो. ही ईश्वरी कृपा प्रत्येक कलाकाराला लाभते. मूर्तीकाराला तर खुद्द याच ईश्वराचे रुप घडवायचे असते. त्यामुळे आपसुकचं ईश्वर त्याच्या पाठीशी असतोच.

जितके बोलके नयन तितकीच मूर्ती आपलीशी वाटते. याच विचाराने मूर्तीकार आपले तन- मन देऊन या नयन रेखाटण्यात दंग असतो. पुरुष मूर्तीकार अनेक आहेत. पण महिला मूर्तीकार आणि त्यातही बाप्पाचे चक्षू रेखाटणा-या महिला मूर्तीकार अगदी हातावर मोजता येतील इतक्याच आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात अशाच काही गुणी मूर्तीकार आहेत. या महिला मूर्तीकारांची ख्याती अगदी शहरभर आहे. या महिला मूर्तीकारांकडूनच आपल्या बाप्पाची मूर्ती विशेषत:  बोलके डोळे साकारले जावे असा नागरिकांचा हट्ट असतो. अनेक भक्तांना आलेल्या सकारात्मक अनुभवांमुळे या महिला मूर्तीकारांच्या कलेची ख्याती शहरभर पसरली आहे.

मूर्ती साकारताना सध्या रबरी मोल्ड उपलब्ध आहे. पण डोळे साकारण्यासाठी मानवी हातचं लागतात. त्यासाठी कोणताही मोल्ड अथवा मशिन नाही. त्यामुळे मूर्ती साकारण्याहून अवघड काम डोळे साकारणे आहे. आनंद असो वा दु:ख, शब्द सोडून मानवी भावना जर दुसऱ्या कोणत्या अवयवातून जशास तशा सांगता येत असतील तर ते म्हणजे डोळे. डोळे बोलके असतात ते असे. हा नियम फक्त सजीव गोष्टींनाच लागू नाही. कारण एखादी मूर्ती किंवा चित्रामध्येही सजीवता आणण्याचे काम हे डोळेच करत असतात. डोळे साकारणे हे कसबी कलाकाराचेच काम आहे. त्याला मोठी साधना लागते.

सुषमा कुंभार- (मूर्तीकार – वय ३६ वर्षे) –

थेरगावातील रहिवासी असलेल्या सुषमा कुंभार गेल्या २० वर्षांहून अधिक काळ गणरायाचे डोळे साकारतायत. लहानपणापासून चित्रकलेची उपजत आवड आणि वडिलोपार्जित कुंभारकाम यामुळे या मूर्तीकामाकडे त्यांचा विशेष ओढा वाढला. त्या सांगतात, गणेशमूर्तीचे डोळे रंगवणे हे खूपच जबाबदारीचे काम आहे.

कारण प्रत्येक गणेशमूर्ती ही माझ्यासाठी साधना आहे. मूर्तीच्या बाह्य़ रूपाप्रमाणे त्याचे डोळे रंगवावे लागतात. त्यानुसार प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यांची सुंदरता आणि मोहकता वेगळी असते. मूर्तीकडे पाहून लोकांना समाधान आणि शांत वाटले पाहिजे. काम करताना आपले भाव मूर्तीत येतात त्यामुळे नेहमी ताजेतवाने राहून डोळे रेखाटावे लागतात. सलग वीस पंचवीस वर्षांचे नेहमीचे आमचे ग्राहक आहेत. ते आवर्जुन आमच्याकडे येतात. मी रेखाटलेले गणपतीचे डोळे ग्राहक ओळखू शकतात इतकी माझ्या कलेची ओळख त्यांना झाली आहे. मी यंदा डोळे रेखाटणार नाही असं कितीही ठरवलं तरिही असे प्रसंग घडतात, ज्यामुळे मला हे काम करावेच लागते. त्यामुळे साक्षात गणेशच माझ्याकडून हे काम करुन घेतो आणि प्रत्येक कार्यात माझ्या पाठिशी उभा राहतो असा मला नेहमी अनुभव आला आहे. आजवर कोणताही चित्रकलेसंदर्भात कोर्स केला नव्हता पण आता मात्र चित्रकलेचा डिप्लोमा करतीये. त्यामुळे माझ्या त्या अभ्यासाचा फायदा मला नक्कीच होईल असा विश्वास आहे.

 शुभांगी कुंभार (मूर्तीकार –वय ३८ वर्षे )- 
माझं माहेर कोल्हापूरचं. तिथे असल्यापासून मूर्तीकाम करते आहे. लग्नानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आले. इथेही माझ्या सास-यांच्या मूर्तीकामाला हातभार लावण्यासाठी मी मूर्तीचे डोळे रेखाटते. मनापासून आवडणारी ही माझी कला मला जपता येते याचा आनंद आहे.

डोळे साकारणे ही साधनाच-

कोणतीही कला हळुहळू फुलत जाते. तशीच ही कलादेखील. यात कलाकाराचा हात, त्यावरील नियंत्रण आणि त्याच्या मनातील भाव याची सांगड घालत डोळे साकारावे लागतात. यासाठी अभ्यासक्रम असला तरिही ही कला शिकता शिकताच येते. स्वत: कलाकाराची रुची आणि निरीक्षण शक्तीचा यात कस लागतो. त्यामुळे तुम्ही जितकं अधिक काम करालं तितकीच ही कला आणखी वृध्दींगत होईल.

…या महिला मूर्तीकार डोळे साकारताना काय काळजी घेतात

गणेशोत्सव जवळ आला की आम्हाला अगदी रात्रंदिवस काम करावे लागते असं या मूर्तीकार सांगतात. पण तरिही डोळे साकारणाऱ्या कलाकाराने आनंदी आणि ताजेतवाने असणे गरजेचे आहे. कंटाळून, जागरण करून, अर्धवट झोप घेऊन तुम्ही हे काम करू शकत नाही. मोठय़ा गणपतीचे डोळे करायला साधरणपणे अर्धा ते पाऊण तास लागतो. तर छोटय़ा गणपतींना तीन ते पाच मिनिटेही पुरतात. त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊन मनात इतर विचार न आणता हे काम करावे लागते. तो कलाकार किती मुरलेला आहे हे डोळे साकारल्यावरच समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button