ताज्या घडामोडीपुणे

गडकरींनी भेट घेतली, आता फडणवीस व राज ठाकरें भेटणार

गडचिरोली  |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सेना-राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. तर दुसऱ्या बाजूला भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवताना मोदी-शहा-फडणवीसांविरोधात एकही शब्द काढला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संभाव्य मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंना भेटणार आहेत.

फडणवीस राज ठाकरेंना भेटणार
“राज ठाकरे आणि माझी भेट होणं काही आश्चर्याची गोष्ट नाहीय. आमचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आमची भेट झाली तर आश्चर्य काय आहे?”, असं फडणवीस म्हणाले. त्यावर भेटीत मनसे-भाजप युतीवर चर्चा करणार का?, असा सवाल पत्रकारांनी विचारताच, “भेटल्यानंतर काय बोलायचं ते आम्हाला ठरवू द्या”, असं म्हणत येणाऱ्या काही दिवसांत राज ठाकरेंना भेटून पुढील सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलंय.

‘आगे आगे देखो होता है क्या’ म्हणत युतीचे स्पष्ट संकेत

देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी भाजपचा मोर्चा पार पडल्यानंतर राज्यातल्या नव्या समीकरणांविषयी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेविषयी तसंच मनसे-भाजप युतीच्या संभाव्य शक्यतेविषयी विचारण्यात आलं. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले.

“राज ठाकरे आणि माझे गेल्या अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी जर त्यांची भेट घेतली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे. भेटी-गाठी होत असतात. भेट घेतल्यानंतर कोणत्या गोष्टींवर चर्चा करायची, हे ठरवू, तुम्ही थोडीशी वाट बघा… पुढे काय घडतंय ते तुमच्या लक्षात येईल…” असं फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीवर फडणवीस भडकले

मनसे ही भाजपची C टीम आहे, शिवसेनेच्या या आरोपावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. कालपर्यंत त्यांची भूमिका आघाडीच्या बाजूने होती, तोपर्यंत त्यांना आवडत होती. गुदगुल्या होत होत्या. आज मात्र विरोधात भूमिका मांडली की B टीम-C टीम असे प्रकार सुरु झाले. मग माझा सवाल आहे, शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीची B, C की Z टीम आहे?, असं म्हणत फडणवीस महाविकास आघाडीवर भडकले.

नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची काल (रविवारी) रात्री मुंबईत भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन नितीन गडकरींनी त्यांती भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी रात्री १० वाजताच्या सुमारास पोहोचले. यानंतर गडकरी हे १२ वाजताच्या सुमारास राज यांच्या घरातून बाहेर पडले. यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत भेटीता तपशील सांगितला.

“ही राजकीय भेट नव्हती. माझे ठाकरे परिवारासोबत कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आणि नवीन घर पाहण्यासाठी भेट दिली, असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं. मात्र असं असलं तरी त्यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असणार, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button