Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आक्रमक प्रश्नांना तोंड देताना सत्ताधारी मंत्र्यांना नाकीनऊ

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आक्रमक प्रश्नांना तोंड देताना सत्ताधारी मंत्र्यांना नाकीनऊ आले आहेत. विधिमंडळाच्या कामाचा दांडगा अनुभव असलेले अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारच्या नवख्या मंत्र्यांना असे काही प्रश्न विचारतात, की हे मंत्री पूर्णपणे निरुत्तर होऊन जातात. त्यामुळे आता अजित पवार  असताना मंत्र्यांना सभागृहात बसण्याचीही भीती वाटू लागली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजावेळी अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. यावरून अजित पवार यांचा पारा पुन्हा चढला. या मुद्द्यावरुन अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्षरश: घेरले होते. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी आमदारांपुढे बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी हा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी ग्रामविकास आणि शालेय शिक्षण खात्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. आम्ही सरकारमध्ये असताना ज्या विभागाची चर्चा असायची त्या खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित असायचे. आता ग्रामविकास खात्याचे मंत्रीच सभागृहात उपस्थित नाहीत. मंत्र्यांनी त्यांच्या खात्याविषयी प्रश्न उपस्थित होताना सभागृहात थांबले पाहिजे. विरोधक काय म्हणतात, ते ऐकून घेतले पाहिजे. आता गिरीश महाजन आणि दीपक केसरकर सभागृहात नाहीत. वरच्या सभागृहात सांगितलं जातं ते खाली आहेत, खालच्या सभागृहात सांगायचं ते वरती आहेत. हे काय चाललंय, असा शब्दांत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले. अजितदादांचा हा शाब्दिक दांडपट्टा फिरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कसेबसे थोपवण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि सात मंत्री सभागृहात उपस्थित आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्रीच सर्व खात्यांची उत्तरं देणार असतील तर मग खातेवाटप केलेच कशाला, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

या सगळ्यादरम्यान जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनीही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. आम्ही माहिती घेतली आहे, गिरीश महाजन आणि दीपक केसरकर दोघे वरच्या सभागृहातही नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे मंत्री वरच्या सभागृहात असतील, असा बचाव करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही काहीशी भंबेरी उडाली. मी याबद्दल माहिती घेतो, असे सांगून त्यांनी आपली सुटका करून घेतली. मात्र, जयंत पाटील यांनी मंत्री उपस्थित नसतील तर सभागृह तहकूब करा, अशी मागणी लावून धरली. मात्र, मंत्र्यांच्या अनुपस्थितीत मी उत्तरे देईन, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. त्यावर धनंजय मुंडे यांनी सभागृहात उभे राहत आक्षेप घेतला.

 

काय फुकट काम करत नाही, सरकारी कर्मचाऱ्यावर भडकले अजित पवार

मुख्यमंत्री अतिश्य सक्षम आहेत, हे आम्हाला माहिती आहे. तुमच्या आजुबाजूला बसणाऱ्यांना याबाबत शंका असेल, पण आम्हाला बिलकूल नाही. पण किती गोष्टींचा भार मुख्यमंत्र्यांवर टाकणार. शिक्षणमंत्र्यांनी सभागृहातील चर्चेला उपस्थित राहायला हवे होते. मंत्री हे सभागृहात गैरहजर राहून सभागृहाचा, मुख्यमंत्र्यांचा आणि विधानसभा अध्यक्षांचा अपमान करत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, ‘तुम्ही आता मुख्यमंत्र्यांवर आणखी भार टाकू नका’, असे म्हटले. पण हा गोंधळ पुढे असाच सुरु राहिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button