breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बाबरीवरुन मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं, दानवेंनी पुन्हा तेच वाक्य ऐकवलं, ठाकरेंना खडे सवाल!

मुंबई :बाबरी मस्जिद (Babri Masjid Demolition) पडली त्यावेळी मी तिथे स्वत: होतो, एकही शिवसैनिक तिथे उपस्थित नव्हता. मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) तीन वेळा बाबरीवरुन आमच्यावर आरोप केला. त्यांना मी सांगतो, तिथे तुम्ही कुणी नव्हता, मी तिथे होतो. उगीच खोट्या गप्पा मारायच्या बंद करा, असा पुनरुच्चार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बीकेसीमधील (Uddhav Thackeray BKC Sabha Ralley) सभेतील टीकेला दानवेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बाबरी मस्जिद हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नव्हता. बाबरी मस्जिद आपल्या देशाच्या संस्कृतीवर झालेला हल्ला होता. ती आम्ही उध्वस्त केली. देशाच्या संस्कृतीवर झालेला हल्ला आम्हाला नष्ट करायचा होता. बाबरी पडतावेळी तुम्ही तिथे कुणीही नव्हतं. मी त्यावेळी स्वत: तिथे होतो. त्यामुळे बाबरीवरुन आमच्यावर आरोप करायचे बंद करा”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

“राज्याची जनता काल मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार म्हणून टीव्हीसमोर बसली. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने लोकांची निराशा केली. गेल्या अडीज वर्षात मुख्यमंत्र्यांनी काय केलं, सरकारने काय काम केलं, महाविकास आघाडीचं सरकार पुढच्या अडीज वर्षात काय काम करणार आहे, याची उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. पण मुख्यमंत्र्यांनी यावर एक चकार शब्द काढला नाही. फक्त भाजपवर टीका आणि आरोप एवढंच कालच्या सभेतून बघायला मिळालं. कालची सभा म्हणजे फक्त निराशा सभा होती”, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. “मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर युती केली म्हणून उद्धव ठाकरे आमच्यावर टीका करतात. पण शिवसेनेने देखील मुस्लिम लीगबरोबर युती केली होती, हे ते सोयीस्कर विसरतात. काँग्रेसने देशावर लादलेल्या आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, हे देखील उद्धव ठाकरे विसरले आहेत. त्यामुळे मला त्यांना सांगायचंय, जुनं उकरुन काढू नका. तुम्ही आता मुख्यमंत्रीपदावर आहात, सरकार म्हणून तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात, हे जनतेला सांगा”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button