पिंपरी / चिंचवड

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी मोफत ई-श्रम योजना

– नगरसेविका आशा शेंडगे यांचा उपक्रम

– गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन

पिंपरी l प्रतिनिधी

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासनाने नवीन योजना सुरु केली आहे. ई-श्रम योजनेत सहभागी होऊन ई-श्रम कार्ड काढल्यास अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपये आणि अपघाती अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने हे सक्षम पाऊल टाकले असून या ई-श्रम योजना कासारवाडी येथे नगरसेविका अशा तानाजी धायगुडे – शेंडगे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.

बुधवार (दि. 12) सायंकाळी 4 वाजता नगरसेविका आशा तानाजी धायगुडे- शेंडगे यांच्या प्रयत्नांतून कासारवाडी परिसरातील प्रात्र नागरिकांसाठी ई- श्रम कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ही योजना 31 जानेवारी 2022 पर्यंत सायंकाळी चार ते सहा या वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने या कामगारांची नोंद करण्याचे ठरवले आहे. शासन या नोंदणीच्या माध्यमातून असंघटित लोकांना युएएन नंबर देते. त्याचे ई-श्रम कार्ड मिळते. हे कार्ड काढल्यास असंघटित क्षेत्रात काम करणा-या अनेक कामगारांना लाभ घेता येणार आहेत.

लहान व सीमांत शेतकरी, शेतमजूर, पशुपालन करणारे, स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार, सुतार, न्हावी, सेंट्रिंग कामगार, वीटभट्टी कामगार, पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्र चालक, रिक्षा चालक, भाजीपाला, फळ, वृत्तपत्र विक्रेते, विडी, स्थलांतरित, लेदर, घरकाम कामगार, ब्युटी पार्लर कामगार, आशा वर्कर, खाजगी क्लासेस संचालक, अंगणवाडी सेविका, सेल्समन, किराणा,  बेकारी,पानपट्टी दुकानदार, हातगाडी ओढणारे, इतर छोटे कामगार व व्यावसायिक या योजनेसाठी पात्र आहेत.

लाभ घेणा-या लाभार्थींचे वय 16 ते 59 वर्षातील असावे. ती व्यक्ती आयकर भरणारी नसावी, ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य नसावेत, वरील कामगार क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असावी. हे निकष पूर्ण करणारे कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आधारकार्ड, वारस नोंदणीसाठी वारसाचे पॅन अथवा आधारकार्ड, बँक पासबुक, सक्रिय मोबाईल क्रमांक अशी कागदपत्रे आवश्यक आहे.

नगरसेविका आशा धायगुडे- शेंडगे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कासारवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 12 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणी करण्यासाठी आल्यानंतर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button