पिंपरी l प्रतिनिधी
चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला आणि तिच्या मुलाला गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 10 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 सप्टेंबर 2017 पासून 13 एप्रिल 2022 या कालावधीत घडला.
स्वप्नील बालवडकर (रा. बालेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या मुलांचा विश्वास संपादन करून आरोपीने फसवण्याच्या उद्देशाने डिमांड प्रोमिसरी नोट करून त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. आरोपीने त्याच्या तळेगाव दाभाडे येथील रॉयल इन्फिल्ड बुलेट आणि एम एस पायोनियर मल्टी सर्विसेस एंड प्रोप्रयटरशिप या दोन व्यावास्यात तीन कोटी 10 लाख रुपये गुंतवण्यात भाग पाडले. ठरल्याप्रमाणे परताव्याचे पैसे तसेच गुंतवलेली रक्कम वारंवार मागूनही परत न करता फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.