breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संघटनांकडून फसवणूक, नेत्यांचे राजकारण; संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी

मुंबई |

विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरूअसलेला संप मागे घेण्याच्या घोषणेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कामगारांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर केल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे तर संघटनांनीही वाऱ्यावर सोडल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कृती समितीतील बडय़ा कामगार संघटनांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला नाही. यात मान्यताप्राप्त संघटनेला आधीच संपाला मनाई केल्याने त्यांनीही शांत राहणेच पसंत केले. एकदिवसीय आंदोलनानंतर विलीनीकरणाचा मुद्दा आणि वार्षिक वेतनवाढीचा मुद्दा मार्गी न लागल्याने कामगारांनी उत्स्फूर्त संप पुकारला. आणि त्याला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला. परिणामी राज्यातील सर्व आगारांतील वाहतूक बंद झाली. विलीनीकरणाच्या मागणीसाठी पडळकर व खोत यांनीच पुढाकार घेऊन संप सुरू केला. परंतु त्यांनीच संपातून माघार घेणे योग्य नसल्याचे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

  • कर्मचाऱ्यांचे म्हणणे काय…

संपकाळात एसटीतील मोठय़ा संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे सांगितलेच नाही. कर्मचाऱ्यांची साधी विचारपूसही केली नाही. सुरुवातीला भत्ते वैगरे देताना आणि अन्य निर्णय घेतानाही कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. यापुढे कामगार संघटनांचे नेतृत्व मान्य करावे की नाही असा प्रश्न आहे, असे मत मुंबई सेन्ट्रल आगारातील वाहक राहुल माने यांनी व्यक्त केले.

जळगाव विभागातील चोपडा आगारातील वाहक युवराज कोळी यांनीही कामगार संघटना कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवूनच सर्व निर्णय घेत असल्याची टिका केली. आतापर्यंत सत्य सांगितलेच नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपात एसटीतील मोठय़ा संघटनांनी भूमिकाच स्पष्ट केली नाही, असे ते म्हणाले. गुहागर आगारातील चालक अविनाश नलावडे यांनीही अनेक आगारांत कामगार संघटनांचे फोटो, बॅनर काढल्याचे सांगितले. संपकाळात जेव्हा गरज होती, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कामगार संघटना उभ्या राहिल्या नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • वेतनवाढ तुटपुंजीच: कामगारांची तक्रार

विलीनीकरण होईपर्यंत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जावे, अशी मागणी एसटी कर्मचारी करत होते. परंतु एसटी महामंडळाने बुधवारी जाहीर केलेली वेतनवाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नाही, तसेच ती समाधानकारकही नसल्याची टीका कर्मचाऱ्यांनी केली. कोल्हापूर विभागातील मलकापूर आगारातील वाहक हेमचंद्र जंगम हे वाहक म्हणून काम करतात. एसटीत २४ वर्षे सेवा करत असून एसटी महामंडळाने दिलेली वेतनवाढ तुटपुंजीच असल्याचे सांगितले. मला एकूण ३ हजार ६०० रुपये वाढ मिळणार आहे. न्यायालयात २० डिसेंबरला सुनावणी असून तोपर्यंत प्रतीक्षा करणार. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी फक्त राजकारण केले, अशी टीका त्यांनी केली. बोईसरमधील वाहक शशिकांत मठपती हे दहा वर्षे एसटीत वाहक म्हणून काम करत असून त्यांना वेतनात चार हजार रुपयांची वाढ मिळाल्याचे सांगितले. ही वाढ मान्य नाही. तसेच नंतर वेतन मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे विलीनीकरण हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button