TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधणार; मंत्री संजय राठोड यांना मात देण्यासाठी शिवसेनेची खेळी

दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातील विद्यमान मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना शिवसेनेत आणण्याची खेळी पक्ष प्रमुखांनी खेळली आहे. संजय देशमुख हे लवकरच शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रविवारी देशमुख यांनी अकोला येथे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केल्याने त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेनकडून संजय देशमुखांना दिग्रस मतदारसंघात सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू

देशमुख मूळचे शिवसैनिकच आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्षात काम केले आहे. १९९९ मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्याने ते अपक्ष लढले आणि राष्ट्रवादीचे ख्वाजा बेग यांना अवघ्या १२५ मतांनी पराभूत करून आमदार झाले. त्याचवेळी अपक्षांची मोट बांधून विलासराव देशमुख यांच्या सरकारला पाठिंबा देत देशमुख राज्यमंत्री झालेत. २००४ मध्येही ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. २००९ मध्ये राठोड यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर राज्यमंत्री संजय देशमुख हे राजकारणातून माघार घेतली होती. मात्र, आता राठोड हे शिवसेनेच्या शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना मात देण्यासाठी शिवसेनेने देशमुख यांना दिग्रस मतदारसंघात सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

देशमुखांनी १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले

देशमुखांनी १९९९ ते २००९ असे तब्बल १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे, दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद दाखवली आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत देशमुखांनी राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत ७५ हजार मते घेऊन राठोड यांचे मताधिक्य कमी केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी दिग्रसमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर परत त्यांनी भाजपची साथ सोडून स्वतंत्र भूमिका घेतली व अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि आता पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास राहणार आहे.

देशमुख लवकरच शिवबंधन बांधण्याची शक्यता

राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा आहे, तर देशमुख यांना मतदारसंघातील मराठा, कुणबी कार्डवर पुढे आणण्याच्या शिवसेनेच्या हालचाली आहेत. शिवसेना प्रवेशाबाबत संजय देशमुख यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांच्याशी चर्चा केल्याने ते लवकरच शिवबंधन बांधण्याची शक्यता त्यांचे समर्थक व्यक्त करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button