breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी आमदार विलास लांडे यांचा संकल्प एकजुटीचा; भोसरीच्या शाश्वत विकासाचा!

  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आव्हान
  • भोसरीच्या गावजत्रा मैदानावर राष्ट्रवादीची राजकीय ‘हवा’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात प्रभाव असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी आता नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत ‘‘संकल्प एकजुटीचा, भोसरीच्या शाश्वत विकासाचा’’ केला आहे. भोसरीतील राष्ट्रवादी आता एकवटली असून, त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गावजत्रा मैदानावर ‘चला हवा येवू द्या’ हा मनोरंजनचा कार्यक्रम झाला. यावेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार विलास लांडे यांनी स्वत: संपूर्ण कार्यक्रम उपस्थित राहून नियोजनावर ‘कंट्रोल’ ठेवले. त्याला डॉ. कोल्हेंच्या उपस्थितीची साथ मिळाली. त्यामुळे हा कार्यक्रम यापूर्वीच्या कार्यक्रमांपेक्षा तुलनेने दमदार झाला. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे डॉ. कोल्हे यांनी लांडे यांच्या अचूक नियोजनाचे कौतूकही केले.

कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजित पवार यांचे योगदान प्रभावीपणे विशद करण्यात आले. तसेच, बैलगाडा शर्यत सुरू होण्याबाबत प्रयत्न केल्याबाबत डॉ. कोल्हे यांना बैलगाडा देवून सन्मान करण्यात आला.
अजित गव्हाणे म्हणाले की, आम्ही भोसरीतील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आलो आहोत. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्त्वाखाली भोसरीचा शाश्वत विकास करण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न राहणार आहे.

विलास लांडे यांची तुफान फटकेबाजी…
गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये जी ‘हवा’ करायची होती ती केली, आता हवा करण्याची बारी आमची आहे. पुणे जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर नेणारे नेतृत्व म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. पण, गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराच्या भस्मासूरांनी शहर विकून खाल्ले. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन करीत निवडणुकीच प्रचाराचे रणशिंगही फुंकले.

डॉ. कोल्हे यांनी आमदार लांडगेंवर बोलणे टाळले…
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीच्या लढ्याचे श्रेय राज्यातील बैलगाडा प्रेमी शेतकऱ्यांचे आहे, असे सूतोवाच केले. भोसरीकरांनी दिलेला बैलगाडा आयुष्यभर जनसंपर्क कार्यालयासमोर ठेवून भोसरीकरांचे प्रेम काळजात जपेन, असा विश्वासही दिला. देशाचे नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधायक कार्याचे दाखले दिले. केंद्र सरकारविरोधात काहीचा सूर असलेल्या डॉ. कोल्हे किंवा नगरसेवक अजित गव्हाणे दोघांनीही पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यावर थेट टिका केली नाही. पण, माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपाविरोधात रान तापवले. त्यामुळे आगामी काळात लांडे विरुद्ध लांडगे असा संघर्ष पुन्हा पेटणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button