breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

लोकसंवाद : राष्ट्रवादीतील अतिमहत्त्वाकांक्षी लोकांकडून माजी आमदार विलास लांडे ‘साईड कॉर्नर’ ?

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिनी केलेल्या अनेक पोस्टस्‌वरुन लांडे गायब
  • शहरातील मातब्बर नेत्याला ‘सन्मान’ न दिल्यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

 

पिंपरी । अधिक दिवे

पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्राचे ‘कारभारी’ असलेले उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस (२२ जुलै) अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. शहर राष्ट्रवादीने प्रचंड फ्लेक्सबाजीसह सामाजिक उपक्रमांचाही धडाका लावला. पण, पक्षातील अनेक महत्त्वाकांक्षी लोकांनी शुभेच्छा फ्लेक्स किंवा उपक्रमांच्या जाहिरातींमध्ये ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलास लांडे यांना टाळले. परिणामी, राष्ट्रवादीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. तर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील अनेकांनी लांडे यांना ‘साईड कॉर्नर’ केले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील शरद पवार’ अशी विलास लांडे यांची ओळख आहे. अत्यंत मुत्सद्दी असलेल्या लांडे यांनी भोसरी मतदार संघातून १० वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ नंतर राष्ट्रवादीला पराभवाचा समाना करावा लागला. सध्यस्थितीला राष्ट्रवादीकडे विलास लांडे यांच्या इतका अनुभवी नेता नाही. भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये नवोदितांना सोबत घेवून लांडे आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी करीत आहेत. पण, पक्षाच्या पहिल्या फळीतील अनेकांना लांडे यांचे नेतृत्त्व अमान्य आहे का? असा प्रश्न आहे.

वास्तविक, माजी आमदार विलास लांडे शहर संघटनेतील महत्त्वाच्या पदावर नाहीत. मात्र, त्यांचा अनुभव आणि नेतेपद कुणीही नाकारु शकत नाही. ‘प्रोटोकॉल’नुसार लांडे यांना फ्लेक्स किंवा सोशल मीडिया पोस्ट्समध्ये स्थान दिले पाहिजे. हा राजकारणातील सुसंस्कृतपणाचा विषय आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीत सत्ता खेचून आणेल आणि विलास लांडे यांच्या तोडीचा असा दुसरा स्थानिक नेता राष्ट्रवादीकडे नाही. तरीही, एक-दोन टर्म नगरसेवकपद भूषवल्यावर अनेकांना लांडे महत्त्वाचे वाटत नाहीत, असे चित्र आहे. याबाबत संबंधित पदाधिकारी आणि स्वत: लांडे यांनीही आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि आमदार अण्णा बनसोडे एकपरी मोठ्या पदावर असल्यामुळे लांडे यांच्या फोटोला फ्लेक्सवर स्थान दिले नाही, तर समजू शकतो. पण, शहरातील विद्यमान विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक समीर मासुळकर, राहुल भोसले, श्याम लांडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर, माजी नगरसेवक अतुल शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्यापासून अगदी युवती आघाडीच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप असतील अनेकांच्या फ्लेक्स आणि पोस्टवरुन लांडे यांचा फोटो गायब आहे.

अजित गव्हाणे तुम्हीसुद्धा…?

माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याची जाहिरात भोसरीत केली. त्यावरही विलास लांडे यांच्यासह स्थानिक कुठल्याच नेत्याचा फोटो दिसत नाही. यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ फुगे यांनी भोसरी फ्लेक्सचा झंझावात केला. पण, त्यावर लांडे यांना स्थान नाही. सौरभ फुगे हे अजित गव्हाणे यांचे नातेवाईक आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे एकेकाळी निष्ठावंत असलेले अजित गव्हाणे विलास लांडे यांना विसरले काय? अशी चर्चा राजकीय पटलावर सुरु झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button