breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

माजी आमदार विलास लांडे म्हणतात… कष्टकरी जनतेची भाजपकडून घोर फसवणूक; आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर!

  • माजी आमदार विलास लांडेकडून सत्ताधारी भाजपच्या आश्वासनांची फ्लेक्सबाजीतून चिरफाड

– विकास शिंदे, कार्यकारी संपादक, महाईन्यूज.कॉम

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. कोरोना महामारीच्या लाॅकडाऊनमध्ये कष्टकरी, हातगाडी, पथारी, रिक्षाचालकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने कष्टक-यांना आणि प्लाझ्मा दान करणा-यांना प्रत्येकी तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली. परंतू, दोन महिने उलटले तरीही गोरगरीब, वंचित, गरजू नागरिकांना आर्थिक लाभ मिळालेला नाही. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांनी सत्ताधारी भाजपच्या आश्वासनांचे फलक शहरभर लावले आहेत. त्यातून भाजपच्या आश्वासनाची चिरफाड करीत ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ अशा आशयाचे फलक लावून महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरुन विरोधकांना शड्डू ठोकत आव्हान दिलं आहे.

राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दीड हजारांची घोषणा केली म्हणून पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भाजपने कायदेशीर अभ्यास व पुर्व नियोजन न करता थेट मदतीची योजना जाहीर केली. शहरातील रिक्षाचालक, परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे रिक्षाचालक, जिम ट्रेनर, बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे, भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नंदीवाले, गोंधळी, भराडी, बँडवाले, वाजंत्री अशा विविध घटकातील गरजू, वंचित, गोरगरीबांना तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली. तसेच प्लाझ्मा तुटवडा जाणवू लागल्यानंतर ‘प्लाझ्मा दान’ करणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ हजार आणि महापाैरांकडून एक हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये देण्याचा निर्णय महापालिकेचे सत्ताधारी भाजपने घेतला. याशिवाय बाहेरील रुग्णांना प्लाझ्मा मोफत देण्यात येईल, असंही सांगण्यात आले.

भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवडकरांना आर्थिक मदतीच्या आश्वासनांचे गाजर दाखवून पुन्हा एकदा फसवणूक केलेली आहे. कष्टकरी, गोरगरीब नागरिकांना कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून नगरसेवकांनी एकत्रित यादी तयार केली. मागील दोन महिन्यापासून नागरिक आर्थिक मदतीसाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र, फसव्या लाभांची योजना जाहीर करुन वंचित घटकांतील नागरिकांचा अपमानच सत्ताधा-यांनी केला आहे. त्यामुळे कष्टकरी, हातगाडी, पथारीधारकांमधून भाजप विरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सत्ताधारी भाजपने कष्टकरी जनतेच्या भावनांचा खेळ करुन आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले आहे. नागरिकांच्या पैशांवर सत्ताधा-यांच्या नजर, कष्टकरी, प्लाझ्मा देणा-यांना दाखविले तीन हजारांचे गाजर, यासह महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार, प्रत्येक ठेकेदारीत भागीदार दोन-चार, या आशयाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शहरभर फलक लावून भाजपने दिलेल्या घोषणांच्या आश्वासनांची पोलखोल केली आहे. महापालिकेतील प्रत्येक घडामोडीवर भाष्य करीत माजी आमदार लांडे यांनी भाजप विरोधात मैदानात उतरुन सळो की पळो करुन सोडले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आर्थिक मदतीचे दाखविलेले गाजर प्रत्यक्षात स्वप्नवत असल्याचे सिध्द करुन दाखविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजप विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

…राष्ट्रवादीची तगडी टीम, पण एक नाय कामाचा!

पिंपरी चिंचवड शहर हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रवादीच्या सत्तेत अजितदादांनी पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलला होता. शहराची ओळख जागतिक पातळीवर नेऊन ठेवली होती. मात्र, राष्ट्रवादी पक्षातील पदाधिका-यांच्या चुकांमुळे महापालिकेच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मागील साडेचार वर्षात भाजपने शेकडो चुका करीत भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. परंतू, विरोधी पक्षातील राष्ट्रवादी पक्षातील पहिल्या फळीतील पदाधिकारी नातेसंबंध जोपासत टिका-टिपण्णी करत आहेत. भाजप विरोधात थेट मैदानात न उतरता केवळ आतील बाजून महापालिकेतील शेकडो कामांमध्ये मिलीभगत, कित्येक कामांत भागिदारी करत सोयीस्कर भूमिका घेवू लागले आहेत. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांनी थेट मैदानात उडी घेत भाजप विरोधात वज्रमुठ बांधत पक्ष बांधणीसाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. परंतू, राष्ट्रवादी काॅंग्रेसची तगडी टीम असतानाही भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवण्यास प्रत्येकजण आपआपल्या सोयीनूसार भूमिका घेत चिडीचूप आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button