breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुळजापूरचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी यांचे निधन

अणदूर – तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी गुरुजींची ओळख होती. राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शिक्षणमहर्षी म्हणूनही तालुक्यात त्यांची ओळख होती.

आलुरे गुरुजींचा जन्म ६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीडच्या पाटोदा तालुक्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर ते अणदूरच्या जवाहर विद्यालयात रुजू झाले. तिथूनच ते मुख्याध्यापक म्हणून १९९० साली निवृत्त झाले. शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आलुरे गुरुजी यांनी अणदूर आणि ग्रामीण परिसरातील विविध गावांत २८ शाळा सुरू केल्या. तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होते. शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच शिक्षकाची नोकरी लागल्यापासून ते आपला २५ टक्के पगार गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी देत असत. शिक्षक व आमदार म्हणून मिळणाऱ्या पेन्शनची रक्कमही त्यांनी गरीब मुलांसाठीच दिली. मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहे सुरू करून शिक्षण उपलब्ध करून दिले.

तसेच काँग्रेसचे निष्ठावान नेते अशीही त्यांची ओळख होती. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मधुकर चव्हाण यांच्यासोबत त्यांचे राजकीय काम सुरू होते. शासनाच्या अनेक समित्यांवरही त्यांच्या नियुक्त्या होत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांचा मोठा गौरवही झाला होता. मराठवाड्यातला दुष्काळ असो किंवा राष्ट्रीय आपत्ती असो आलुरे गुरुजी आणि त्यांच्या शाळेची आपत्तीग्रस्तांना मदत ठरलेली असे. महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचाराने ते प्रभावीत होते. मराठवाड्याचे साने गुरुजी अशीही त्यांची ओळख होती. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानातदेखील ते सहभागी होते.

सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले. त्यांनी शेकापचे तत्कालीन आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. त्यावेळी आलुरे यांना ३४ हजार १२१, तर खपले यांना १९ हजार ५४२ मते पडली होती. त्यानंतर १९८५ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यांनी आलुरे यांचा ११ हजार २३० मतांनी पराभव केला होता. १९८५ साली शेकापचे खपले यांना ४२ हजार ५५३ आणि काँग्रेसचे आलुरे यांना ३१ हजार ३२३ मते मिळाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button