मुंबई | आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात अवाजवी प्रभाव टाकून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचे पुराव्यांतून दिसून येते, असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारला होता. देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने देशमुख यांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच सीबीआयकडून तपास करण्यात येणाऱ्या मुख्य प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे खटला लवकर सुरू होण्याची शक्यताही कमी आहे, असा दावा देशमुख यांनी जामिनाची मागणी करताना केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खोटय़ा प्रकरणात गोवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला जात आहे व आपली छळवणूक केली जात आहे, असा दावाही देशमुख यांनी केला.