breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

अपक्ष आघाडीची मोर्चेबांधणी : पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत त्रिशंकू लढत होणार?

प्रमुख तीनही पक्षांमधील नाराज नेत्यांकडून चाचपणी

सत्ताधारी भाजपामधील काहीजण ‘नुराकुस्ती’च्या तयारीत

पिंपरी । अधिक दिवे

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीत भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार, अशी चर्चा असतानाच आता भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष आघाडी अशी तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी तीनही पक्षांतील (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) नाराज नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे.

२०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून अनेकांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी भाजपाचे वातावरण होते. परंतु, भाजपातील अंतर्गत धुसफूस आणि अपेक्षीत न्याय न मिळाल्यामुळे काही नगरसेवक नाराज आहेत. अनेकांनी राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली आहे. केवळ ‘पर्मिशन’ची प्रतीक्षा आहे. भाजपामधील २० ते २५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच होईल, असे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी झाल्यास तिकीटाची खात्री नाही. त्यामुळे अनेकांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत ‘वेट अँन्ड वॉच’ ची भूमिका ठेवली आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपामध्येही नाराजांची संख्याही लक्षणीय आहे. ज्येष्ठ नेत्यांपैकी काहींचा आपआपल्या प्रभागात किंवा मतदार संघामध्ये प्रभाव आहे. प्रमुख पक्षांकडून किंवा नेत्यांकडून न्याय मिळत नसल्याच्या उद्विघ्नतेतून अपक्ष आघाडी स्थापन करुन राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय नाराज गटाकडून करण्यात येणार आहे.

‘पिंपरी-चिंचवड विकास आघाडी’ची मुहूर्तमेढ कधी?

महापालिका निवडणूक अवघ्या ६ महिन्यांवर आली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भाजपा पक्षातील अंतर्गत बंडाळीला कंटाळलेली मंडळी आणि ज्यांना तिकीटाची शास्वती नाही, असे नगरसेवक अपक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी ‘पिंपरी-चिंचवडचा स्वाभीमान’ असे ‘कार्ड’ वापरले जाणार आहे. ‘पिंपरी-चिंचवड विकास आघाडी’ असे नाव त्यासाठी जवळपास निश्चित केले आहे. याबाबत पुढाकार घेतलेल्या काही नेत्यांची दोनदा गुप्त बैठकही झाली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पण, पिंपरी-चिंचवड विकास आघाडीला कधी मुहूर्त मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

…असे असेल अपक्ष आघाडीचे गणित!

सध्यस्थितीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ पैकी सर्वाधिक ७७ नगरसेवक आहेत. अपक्ष पाच आणि राष्ट्रवादीची नगरसदस्य संख्या ३६ इतकी आहे. आता पिंपरी-चिंचवड विकास आघाडीचे समीकरण झाल्यास २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे संख्याबळ घटणार आहे. अपक्ष आघाडीने ५४ ते ५६ जागांवर ‘फोकस’ करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी किमान ३५ जागा निवडून आणण्याची तयारी करण्यात येईल.  त्यामुळे सत्ताधारी भाजपाची घसरण होवून ४० जागा मिळतील. राष्ट्रवादीच्या ४ जागा वाढतील म्हणजे ४० इतकी संख्या होईल. राष्ट्रवादीची ही संख्या भाजपाला तुल्यबळ राहील. महाविकास आघाडी झाली किंवा नाही तरी शिवसेनेला किमान १० जागा मिळतील. मनसे, आम आदमी पार्टी आणि अपक्ष असे किमान ३ सदस्य सभागृहात जातील, असे गणित अपक्ष आघाडीच्या चाचपणीत मांडले जात आहे. त्याद्वारे सर्वाधिक जागा मिळवलेल्या राष्ट्रवादी किंवा भाजपासोबत अपक्ष आघाडी आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवणार आहे. महापालिकेतील ‘किंगमेकर’ होण्यासाठी बंडखोर विचारांचे नेते धडपड करीत आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय नाराज नेत्यांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button