breaking-newsताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय

स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रो ट्रेनचे औपचारिक अनावरण

 पुणे : प्रतिनिधी 

कोलकाता येथील टिटागढ कंपनीच्या कारखान्यात अॅल्युमिनियमद्वारे तयार करण्यात आलेल्या पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मेट्रो ट्रेनचे औपचारिक अनावरण शनिवारी झाले. पुढील दोन ते तीन दिवसांत ही ट्रेन पुण्याला पाठविण्यात येणार असून, कोलकात्यात बनविण्यात येणाऱ्या सर्व ३१ ट्रेन मार्च २०२३पर्यंत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) पुरविण्यात येणार आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, केंद्रीय नगरविकास विभागाचे विशेष कार्याधिकारी जयदीप, टिटागढचे अध्यक्ष जे. पी. चौधरी, व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी या वेळी उपस्थित होते. पुणे मेट्रोसाठी टिटागढतर्फे ३४ ट्रेन पुरविण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या निर्मितीची प्रक्रिया गेल्या वर्षीपासून सुरू झाली असून, पहिल्या ट्रेनची निर्मिती पूर्ण झाल्याने त्याचा औपचारिक समारंभ शनिवारी घेण्यात आला. इतर मेट्रोच्या तुलनेत अॅल्युमिनियम बनावटीचे डबे वजनाने हलके असल्याने ऊर्जा बचत करतात, असा दावा महामेट्रोतर्फे केला जात आहे.

पुणे मेट्रोसाठी यापूर्वीच इटलीहून दाखल झालेली एक ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी इटलीतून आणखी एक ट्रेन दाखल झाली आहे, तर कोलकात्यातील पहिली ट्रेन आणि इटलीतून येणारी तिसरी ट्रेन पुढील महिन्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, कोलकात्यामध्ये पुढील ट्रेनसाठी डब्यांची निर्मिती प्रगतीपथावर असल्याने येत्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने आणखी मेट्रो ट्रेन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी दाखल होणार आहेत.

अॅल्युमिनियम कोचच्या निर्मितीमुळे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार होत असल्याबाबत समाधान व्यक्त करून देशभरात मेट्रो सेवा आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांसाठी पूरक व्यवस्था (इकोसिस्टीम) तयार होत असल्याचे मनोज जोशी यांनी नमूद केले. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशात मेट्रोचे डबे बनविणारी एकही कंपनी नव्हती; पण आता अॅल्युमिनियमसारख्या वजनाने हलक्या डब्यांची निर्मिती भारतात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे मत दीक्षित यांनी व्यक्त केले.

मेट्रो कोचची वैशिष्ट्ये

– इतर डब्यांपेक्षा ६.५ टक्के उर्जा बचत

– तीन डब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता ९७८

– सर्व मेट्रो कोचमध्ये सीसीटीव्ही

– मेट्रोचा अधिकतम वेग ९० किमी/प्रति तास

मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

शहरातील मेट्रो सेवेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शनिवार-रविवारी मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय ‘महामेट्रो’ने घेतला आहे. यापूर्वी पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेज मार्गावर दिवसभरात दर ३० मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. आता, शनिवार-रविवारी पिंपरीत सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत दर २५ मिनिटांनी, तर वनाझ ते गरवारे कॉलेज मार्गावर दर २० मिनिटांनी मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध असेल, असे नियोजन केल्याचे ‘महामेट्रो’ने जाहीर केले आहे.

पहिल्या टप्प्यात १२ किमी मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यावर उर्वरित २० किमी मार्गावरील सर्व कामे मार्च २०२३पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. तोपर्यंत सर्व ट्रेन दाखल होणार असल्याने पुणेकर प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देणे शक्य होणार आहे.

– अतुल गाडगीळ,

संचालक (प्रकल्प), महामेट्रो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button