breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापुरात प्रथमच मशिदीत करोना लसीकरण

सोलापूर |

करोनाच्या नव्याने उत्परिवर्तित झालेल्या ओमायक्रॉन विषाणूचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने करोना लसीकरण मोहिमेला गती दिली असताना, त्यास प्रतिसाद देत सोलापुरात एका मशिदीमध्ये लसीकरण शिबिर भरविण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक स्त्री-पुरूषांनी लसीकरण करून घेतले. त्यासाठी मशिदीच्या पेशइमामांनी मागील आठ दिवसांपासून मशिदीत नमाज पठाणाच्यावेळी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले होते. त्याचे चांगले दृश्य परिणाम या शिबिरातून पाहायला मिळाले. शहरातील मुस्लीम पाच्छा पेठेत नुरे इस्लामी मशिदीमध्ये दैनंदिन नमाज पठणाबरोबरच करोना प्रतिबंधासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी भेट देऊन मशिदीचे विश्वस्त, मुतवल्ली आणि पेशइमाम यांची प्रशंसा केली.

ओमायक्रॉन या करोनाशी संबंधित नवा विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे प्रशासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. त्यासाठी कठोर उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. दोन्ही लसमात्रा न घेतलेल्या व्यक्तींना शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह बँका, मॉल व अन्य कोणत्याही ठिकाणी प्रवेश नाकारला जात आहे. दोन्ही लसमात्रा न घेतलेल्या रेशन कार्डधारकांना रेशन धान्याचे वितरणही थांबविण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे महत्त्व नुरे इस्लामी मशिदीचे पेशइमाम अब्दुल कलाम शाह आणि प्रमुख मुतवल्ली उस्मान रचभरे यांनी मशिदीत दररोज नमाज पठणासाठी येणाऱ्या बांधवांना पटवून देण्याचे आणि त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे ठरविले. त्यासाठी मागील आठवडाभर मशिदीत प्रबोधन केले जात होते. लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून ते आरोग्यासाठी कसे हितावह आहे, हे पटवून दिले गेले. त्यास प्रतिसाद मिळाला. त्यानुसार मशिदीतच लसीकरण शिबिर आयोजिले गेले. यानिमित्ताने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे पथकही प्रथमच मशिदीत आले. नमाजाच्या वेळा वगळता दिवसभर लसीकरण सुरू होते. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक रियाज खरादी यांनी सहकार्य केले. शेख इरफान बागवान, रफिक विजापुरे, पत्रकार सलाऊद्दीन शेख, हकीम शमशाद शेख आदींनी लसीकरण शिबिरासाठी उत्कृष्ट नियोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button