ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फुले, शाहूसृष्टीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहचवा – संभाजीराजे

आता ख-या अर्थाने पिंपरी महापालिकेची श्रीमंती वाढली

पिंपरी चिंचवड | महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराजांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले. समाजाला दिशा दिली. पुरोगामीत्वाचा पाया रचला. नवीन पिढीला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार पोहोचणे ही काळाची गरज आहे. फुले, शाहूसृष्टीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहचवावेत, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.महापालिका फार श्रीमंत असल्याचे ऐकून होतो. पण, श्रीमंती ही नुसती पैशांनी होत नाही. श्रीमंती विचाराने होते आणि महापालिका शाहूसृष्टीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार पेरणार आहे. त्यामुळे ख-या अर्थाने तुमची श्रीमंती वाढली असेही ते म्हणाले.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, फुले सृष्टी आणि केएसबी चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे उभारण्यात येत असलेल्या शाहूसृष्टीच्या कामाचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आज (मंगळवारी) भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, मारुती भापकर उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, ” फक्त शाहू-फुले-आंबेडकर म्हणून चालणार नाही. तर, त्यांनी आपल्या जीवनात काय केले. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता. ते आपल्यापेक्षाही शंभर वर्ष पुढे होते. पुरोगामी म्हणजे ‘प्रोग्रेसिव्ह’ होय. हा साधा, सोपा शब्द आहे. त्यांनी 100 वर्षे अगोदर ‘प्रोग्रेसिव्ह’ विचार केला. मानगावच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना बोलविले होते. शाहू महाराज त्या कार्यक्रमाला आले.

यापुढे मी बहुजन समाजाचे नेतृत्व करणार नाही. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे नेतृत्व करतील असे शाहू महाराज आपल्या भाषणात म्हणाले. आताच्या काळात एक पुढारी दुस-या पुढा-याचे कौतुक करत नाही. परंतु, त्यावेळी शाहु महाजारांनी किती मोठा ‘प्रोग्रेसिव्ह’ विचार केला. किती मोठी दुरदुष्टी असेल”.

” त्याच्यापलीकडे जाऊन सांगतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरच्या एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी माझी जयंती साजरी करु नका, पण जंयती साजरी करायची असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांची करा असे सांगितले.

“हा किती मोठा विचार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे एवढे मोठे काम आहे. आपण फक्त पुस्तकात सत्यशोधक समाज वाचतो. किती नवीन पिढीला सत्यशोधक समाज माहित आहे. सत्यशोधक समाज का उभा राहिला. त्याची रचना काय होती. त्याबाबत नवीन पिढीला काहीच माहिती नाही. सत्यशोधक समाजाचाला चालना देण्याचे काम सुद्धा शाहू महाराजांनी केले”, असेही ते म्हणाले.

”शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे काय विचार होते. ते बघा, महापुरुषांचे विचार पुस्कात वाचतो. ते सर्वांना माहिती नाहीत. त्यांचे सर्व विचार शाहूसृष्टीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावेत. महापुरुषांचे विचार जपण्यासाठी जे काही करावे लागेल. ते मला सांगा. केव्हाही अहोरात्री मला मदत मागा. बाकीची कामे थांबतील. पण, ज्या महापुरुषांनी देशाला, महाराष्ट्राला दिशी दिली. त्यांच्यासाठी आपण केव्हाही अहोरात्र येवून काम करु” असेही संभाजीराजे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ख-या अर्थाने श्रीमंती वाढली

”पिंपरी-चिंचवड महापालिका फार श्रीमंत पालिका आहे असे आमच्या कानावर होते. पण, श्रीमंती ही नुसती पैशांनी होत नाही. श्रीमंती विचाराने होते आणि आज शाहूसृष्टीच्या माध्यमातून महापालिका महापुरुषांचे विचार पेरणार आहे. ख-या अर्थाने महापालिकेची श्रीमंती वाढली” असेही संभाजीराजे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button