कार सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव; स्फोटाचे आवाज, अनेक गाड्या जळून खाक
मुंबई |
मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पाहायला मिळालं. पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागलीय. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्य आहेत. ही आग इतकी मोठी आहे की यामुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. या आगीत कोट्यावधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय. याशिवाय या ठिकाणी अनेक कामगार देखील काम करत होते. ही आग संपूर्ण सर्व्हिस सेंटरमध्ये पसरलीय. आजूबाजूला अनेक रहिवासी इमारती देखील आहेत. त्यामुळे या आगीचा फटका आजूबाजूच्या इमारतींना लागू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.