TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्येवर कायमचा तोडगा काढा : आमदार महेश लांडगे

– मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
– महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध

पिंपरी । प्रतिनिधी
औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्यांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. तसेच, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले आहे.विशेष म्हणजे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. यामुळे भोसरी व आकुर्डीमधील जवळपास ६० हजार ग्राहकांकडील तसे साडेसहा हजार लघुउद्योगामधील वीज गायब झाली. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरण, महापारेषण कर्मचाऱ्यांकडून अत्यंत बेजबाबदारीने काम केले जात असल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसातून दोन ते चार वेळा ‘ब्रेकडाऊन’ होत असतो. यामुळे कारखान्यांचे उत्पादनही मंदावले आहे. याचा शहरातील उद्योगांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. भोसरी वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने जो संपर्क क्रमांक दिला आहे. तो सतत व्यस्त व नॉटरिचेबल असतो. महावितरणचे अघिकारी वीज खंडित झाल्यावर उडवा-उडवीचे उत्तर देत असतात. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तरी पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढावा व सर्वसामान्य नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन…
पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीचा धिक्कार असो. अकार्यक्षम ऊर्जामंत्री यांचा धिक्कार असो… अशा आशयाचा फलक हातात घेवून लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले. तसेच, सभागृहात हा मुद्दा उपस्थित करुन वीज समस्यांमुळे शहरातील उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लघुउद्योजक, नागरिक हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने वीज समस्येबाबत ठोस पावले उचलावीत. अन्यथा पिंपरी-चिंचवडमधील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button