सामान्यांना आर्थिक भुर्दंड; डिझेल आणि पेट्रोल महागले
नवी दिल्ली – सर्वसामान्य नागरिकांना आज मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपासून डिझेलची दरवाढ सुरूच होती. त्यात आज डिझेल २५ पैसे, तर पेट्रोल २० ते २२ पैसे लिटर एवढे महागले आहे. यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यापूर्वी तेल कंपन्यांनी २४, २६ आणि २७ सप्टेंबरला डिझेलची दरवाढ केली होती.
आजच्या इंधन दरवाढीनुसार मुंबईत पेट्रोल २१ पैशांनी महागले आहे. त्यामुळे ते १०७ रुपये, ४७ पैसे लिटर झाले आहे. डिझेलच्या दरात २७ पैशांची वाढ झाल्याने ते ९७ रुपये २१ पैसे लिटर झाले आहे. दिल्लीत पेट्रोल २० पैशांनी आणि डिझेल २५ पैशांनी महागले. यामुळे दिल्लीत पेट्रोल १०१ रुपये ३९ पैसे आणि डिझेल ८९ रुपये ५७ पैसे लिटर झाले आहे. कोलकत्यात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २५ पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोल १९ पैसे आणि डिझेल २४ पैशांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने ही इंधन दरवाढ झाली असल्याचे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.