महिला विनयभंगाचे निगडी, वाकडमध्ये तीन गुन्हे
पिंपरी l प्रतिनिधी
निगडी परिसरात एक तर वाकडमध्ये दोन विनयभंगाच्या घटना घडल्या. यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मंगळवारी (दि. 21) याप्रकरणी गुहे दाखल करण्यात आले आहेत.
निगडी पोलिसांनी साहिल कुटे (वय 21, रा. आकुर्डीगाव) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने फिर्यादी यांची 12 वर्षीय मुलगी आणि तिची 13 वर्षीय मैत्रीण या दोघांना एका इमारतीच्या टेरेसवर बोलावून त्यांच्याशी अश्लील कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
वाकड पोलीस ठाण्यात एका महिलेच्या फिर्यादीनुसार विलास पवार उर्फ महाराज (रा. पाटोदा, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांच्याशी जवळीक साधली. त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करून त्यांना अश्लील व्हिडीओ पाठवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुस-या गुन्ह्यात महिलेच्या फिर्यादीनुसार नवनाथ बारणे उर्फ तात्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले. तसेच त्यांच्या मुलीसोबत देखील गैरवर्तन करून त्या दोघांची विनयभंग केला. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.