फेम अभिनेत्री रुपाली भोसलेला कोरोना
मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते!’ फेम संजना अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले हिला कोरोनाची लागण झाली आहे. रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. रुपाली सध्या होम क्वारंटाईन झाली आहे.‘सर्वतोपरी काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व नियमांचे पालन करत असून स्वतःला आयसोलेट केले आहे. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मला खात्री आहे, मी लवकरच यातून बरी होईन. प्लीज सगळ्यांनी सुरक्षित राहा आणि मास्क घाला. प्रत्येकाने आपापली आणि इतरांची काळजी घ्या. मास्क लावायला विसरु नका’, असे आवाहन रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरीतून केले आहे. अभिनेत्री रुपाली भोसले सध्या होम क्वारंटाईन असल्यामुळे मालिकेत पुढचे काही भाग संजना ही व्यक्तिरेखा न दिसण्याची शक्यता आहे.
‘आई कुठे काय करते!’ मालिकेत रुपाली भोसले ‘संजना दीक्षित’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात रुपाली झळकली होती. ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी राहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. तसेच कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे.