breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

हळदीच्या दरात घसरण; ‘जीएसटी’ लागू केल्यानंतर सांगलीत क्विंटलमागे अठराशे रुपयांनी घट

सांगली |

हळदीवर पाच टक्के ‘जीएसटी’ लागू केल्यानंतर सांगली बाजारात हळदीच्या दरात क्विंटलमागे हजार ते अठराशे रुपयांनी घट झाली आहे. गेल्या आठवडय़ामध्ये सरासरी ९ हजार ९५० रुपये असलेला दर सोमवारी सौदे सुरू होताच ८ हजार १५० रुपयांवर स्थिरावला. सांगली बाजारात हळद, गूळ, बेदाणा यांचे सौदे होत असले तरी सर्वात जास्त उलाढाल हळदीच्या व्यापारात होते. गेल्या आठवडय़ात महाराष्ट्र अग्रिम अभिनिर्णय प्राधिकरणाने हळदीवर ५ टक्के ‘जीएसटी’ लागू होत असल्याचा निर्णय जाहीर केल्याने याचा थेट परिणाम हळद सौद्यावर सोमवारी दिसून आला.

खरेदीदारांनी हळदीसाठी बोलीच कमी लावली. सोमवारी सांगलीच्या बाजारात २२३ क्विंटल हळदीची आवक झाली, तर १ हजार ५६२ क्विंटल हळदीची विक्री झाली. सौद्यामध्ये किमान दर ५ हजार तर किमान दर ११ हजार ३०० रुपये मिळाला. दराची सरासरी ८ हजार १५० रुपयांपर्यंत उतरली आहे. ‘जीएसटी’चा निर्णय जाहीर होण्यापूर्वी बाजारात हळदीचा क्विंटलचा दर सरासरी ९ हजार ९५० रुपयांपर्यंत होता असे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.

  • ‘महाराष्ट्र चेंबर’चा विरोध…

कोल्हापूर : महाराष्ट्र जीएसटीच्या अग्रिम अभिनिर्णय प्राधिकरणाने हळद ही शेतमालात समाविष्ट होणार नाही, असा निर्णय देणे हास्यास्पद आहे. तो राज्यातील हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरकडून या निर्णयास विरोध केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी येथे दिली. हळद (हळद पावडर अतिरिक्त) विक्रीसाठी जीएसटी लागू होणार किंवा कसे या संदर्भात अग्रिम निर्णयासाठी सांगली येथील हळद अडत्यांनी दाखल केलेल्या प्रकरणात निर्णय देताना जीएसटी आयुक्त यांनी हा निर्णय दिला आहे. हळद विक्रीसाठी अडत्यांना मिळणाऱ्या दलालीवरही जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय दिल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button