breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

‘बनावट हिंदुहृदयसम्राट जनेतेने झिडकारला’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घाणाघात

कोल्हापूर: भारतात बनावट हिंदुहृदयसम्राट करण्याचा प्रयत्न झाला, पण जनतेने तो झिडकारुन लावला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला. मदतीला धावून जाणारा, संकटसमयी धीरोदात्तपणे सामोरा जाणाराच हिंदूहदयसम्राट होऊ शकतो असे सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच (Balasaheb Thackeray) हिंदूहृदय सम्राट आहेत याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. (cm uddhav thackeray criticize bjp saying the people rejected the fake hindu hriday samrat)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील टीकेचाही समाचार घेतला.

राजर्षी शाहू आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून कोल्हापूरशी सुरू असलेली नाळ ठाकरे घराण्याने जपली असून कोल्हापूर शहर हिंदूत्वाचाच बालेकिल्ला राहणार, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडलेले नाही. उलट तुम्हीच शिवसेनेचे हिंदुत्व सोडले, असा आरोपही केला. २०१४ ची निवडणूक भाजप-शिवसेना वेगवेगळे लढूनही शिवसेनेला ६९ हजार तर भाजपला ४५ हजार मते मिळाली होती. मग २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना दोन्ही पक्षाची मते मिळून शिवसेनेला एक लाखाच्या पुढे का मते पडली नाहीत?, असा प्रश्नही त्यांनी भाजपला केला. तुम्ही छुपी मते विरोधकांकडे वळवलीत. आम्ही समोरुन वार करतो, मागून वार करत नाही, असे सांगून ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत मतदार शिवसेना काँग्रेसलाच मतदान करतील असे ठासून सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी लेचीपेची नसून आमच्या तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते मराठी मातेची लेकरे आहेत. आम्ही आघाडी सरकारचा प्रयोग यशस्वी केला आहे. कोल्हापूरातील कट्टर शिवसैनिक काँग्रेसबरोबर राहतील. हिंदूत्वाचा ठसा पुसू दिला जाणार नाही.

शिवसेनेच्या फलकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत सोनिया गांधी यांचा फोटो असतो या कालच्या फडणवीस यांच्या टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी आम्ही अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले. तुम्ही फलकावर अटलजींचेही फोटो लावत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेले वचन अमित शहा यांनी का मोडले असा सवालही त्यांनी केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या विरोधाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तुमचा भगवा नकली आहे- मुख्यमंत्री

भाजपचा नकली बुरखा फाडायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि साधूसंताचा भगवा आहे. तुमचा भगवा खरा नाही, नकली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कर्नाटकात कानडी अत्याचाराखाली भगवा तुडवला जात असतानाही भाजप काहीच बोलत नाही. सीमाभागातील भगव्याला एक डाग लागला नसतानाही बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीत वॉर्ड फोडून तुम्ही भगवा उतरवला. सीमालढ्यात भाजप भगवा झेंडा घेऊन कधीच उतरत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. चंद्रकांत पाटील कर्नाटकात जाऊन जन्म घ्यावा तर कर्नाटकात असे गाणे म्हणून महाराष्ट्र राज्याचा, भाषेचा अपमान करतात. त्यांनी आम्हाला भगव्याचा अभिमान शिकवू नये असा इशाराही दिला.

भाजप महागाईबद्दल बोलत नाही. गरीबांना मोफत गहू आणि तांदूळ दिले आणि गॅसचा दर वाढवला. त्यांनी अन्न शिजवायचे कसे असा प्रश्न ठाकरे यांनी केला. पेट्रोल दरवाढ कमी करत नाही म्हणून टीका करता आणि आमचे हक्काचे जीएसटीचे २५ हजार कोटी रुपये तटवता. तुम्ही रोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढवायचे आणि आम्ही कमी करायचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सभेला खासदार विनायक राऊत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसागांवकर, माजी आमदार मालोजीराजे, शिवसेना संपर्क नेते अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख जयवंत हरुगले, हर्षल सुर्वे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button