breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली लस; माहिती अधिकारातून उघड

बारामती – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची बाब अखेर आता समोर आली आहे. बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळविली आहे. तसेच तन्मय फडणवीसच्या ट्विटर अकाउंटवर त्याने ‘ऍक्टर’ असा प्रोफाईल इन्फो लिहिलेला असताना त्याला आरोग्य कर्मचारी म्हणून लस कशी मिळाली? असा प्रश्न नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

एप्रिल २०२१मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतल्याचे प्रकरण बरेच गाजले होते. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस हा तेव्हाच्या वयाच्या अटीमध्ये बसत नसूनदेखील त्याला लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी टीका केली होती. मे महिन्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. परंतु तन्मय फडणवीस हा आपला दूरचा नातेवाईक आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत हात झटकले होते. तन्मय फडणवीस याने नियम तोडून लस कशी घेतली, हे आपल्याला माहित नसल्याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले होते. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचे नाते असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत कोरोनाची लस घेतल्याचे माहिती अधिकारातून आता उघड झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी २१ एप्रिल २०२१ रोजी यासंदर्भातल्या माहितीची मागणी करणारा अर्ज मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात केला होता. त्यासंदर्भात ४ जून २०२१ रोजी माहती पुरवण्यात आली असून त्यामध्ये यासंदर्भातला खुलासा करण्यात आला आहे. याच सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मय फडणवीस याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. पहिल्या डोसनंतर मिळालेले प्रमाणपत्र दाखवून नागपूरमध्ये त्याने दुसरा डोस घेतला होता. मात्र त्याला पहिला डोस कशाच्या आधारावर देण्यात आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. त्यावर आता या माहिती अधिकारांतर्गत खुलासा झाला आहे.

‘१३ मार्च रोजी सकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी तन्मय फडणवीस, वय वर्षे २५ यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. अभिलेखानुसार त्यांची वर्गवारी हेल्थकेअर वर्कर अशी दिसून येते. प्रचलित कार्यप्रणालीनुसार तन्मय फडणवीस यांनी कोविन ऍपमध्ये केलेल्या नोंदणीनुसार त्यांनी नोंदणीसाठी नमूद केलेल्या शासकीय ओळखपत्राची खातरजमा करून त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे’, अशी माहिती रुग्णालयाकडून आलेल्या लेखी उत्तरात देण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button