breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

लखीमपूर खेरीची तुलना जालियानवाला बागशी करणाऱ्या शरद पवारांना फडणवीसांचा अप्रत्यक्ष टोला; म्हणाले,…

नागपूर |

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी पक्षांनी या बंदला समर्थन दिलं असलं तरी विरोधक असलेल्या भाजपाने मात्र या बंदवर टीकास्त्र सोडलं आहे. हा बंद म्हणजे केवळ ढोंग असल्याची टीका भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. या बंदच्या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना ते म्हणाले, आजचा जो बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. ही तीच मंडळी आहे की ज्या मंडळींनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना नैतिकता तरी आहे अशा प्रकारचं आंदोलन करायची? लखीमपूरची घटना गंभीर आहे. तिथलं सरकार त्यावर कारवाई करत आहे. पण आजचा बंद हा तिथल्या घटनेला संवेदना दाखवण्यासाठी नाही, तर त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का अशा संकुचित राजकीय विचाराने केलेला आजचा बंद आहे.

लखीमपूर खेरी इथल्या हिंसाचाराची तुलना जालियानवाला बाग इथल्या हत्याकांडाशी केल्यामुळे शरद पवार यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो, त्यावेळी जालियानवाला बाग का आठवत नाही? राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना लाठीने तुडवलं गेलं, त्याच्यावर हे का बोलत नाहीत? मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर जेव्हा गोळीबार करण्यात आला, ते जालियानवाला बाग होतं. म्हणून मला वाटतं की जालियानवाला बागेची आठवण करुन देणारे जे लोक आहेत, त्यांच्याच सरकारने कशा पद्धतीने शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, हे पाहावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचं मत व्यक्त केलं होतं. शरद पवार म्हणाले होते, “केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे संवेदनशील नाहीये. जालियनवाला बागमध्ये झालेली परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरू आहे, मात्र २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button