breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक; म्हणाले “महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला, पण…”

मुंबई |

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून टीका होत आहे. दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात चांगली कामगिरी केली असून विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. या विजयानंतर मुंबईतील भाजपा कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार यांनी महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद असल्याचं दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी गोवा कोणाला जिंकता येत नाही असंही सांगितलं.

गोव्यात भाजपा नेत्यांमधील वादासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “गोव्यात भाजपाच नव्हे तर कोणीही असलं तरी वाद निर्माण होतो. गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार असल्याने भाजपा कार्यालयात त्यांचं मोठं स्वागत झालं, ढोल वाजवले, लेझीम खेळले. विधानभवनातही त्यांचं मोठं स्वागत झालं. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचं राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात”.

पुढे ते म्हणाले की, “पणजीत उत्पल पर्रीकरांचा पराभव झाल्यानंतर भाजपा उमेदवार बाबुश यांनी आपल्या विजयात पक्षाचा सहभाग नसल्याचं सांगितलं. त्यामुळे गोव्यात आमच्यामुळे पक्ष जिंकला असं कधीच होत नाही. पक्षापेक्षा त्या भागातील व्यक्तीचं महत्व असतं. अशा व्यक्तींचं झुंड एकत्र येतं आणि ते सरकार बनवतात”.

  • “शरद पवार टार्गेट असून बदनाम केलं जात आहे”

फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीससंबंधी बोलताना ते म्हणाले की, “विजयाच्या शिल्पकाराला नोटीस येऊ नये असं कोणी म्हटलं आहे. नोटीस आम्हालाही येतात पण आम्ही तमाशा केला नाही. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील नेत्यांच्या विरोधात सुडबुद्धीने वागत आहेत. त्यांना राज्यातील टार्गेट दिले असून हल्ले करण्यास सांगण्यात आलं आहे. या देशात असं कधी घडलं नव्हतं. शरद पवार टार्गेट असून बदनाम केलं जात आहे. दाऊदचा कसला संबंध लावत आहेत? काल पक्षात आलेले लोक हे शरद पवारांसंबंधी ज्या भाषेत बोलत आहेत हे फडणवीस, मोदींना, गडकरींना मान्य आहे का? मान्य नसेल तर महाराष्ट्राचे पुढारी म्हणून त्यांनी खंडन, निषेध केला पाहिजे”.

“राजकीय मतभेद असू शकतात, पण ज्या पद्धतीची भाषा शरद पवारांसारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी वापरली जाते. आम्ही काही बोललो की शरद पवारांचे चमचे म्हटलं जातं. या महाराष्ट्राच्या लोकांचा सन्मान राहिला पाहिजे. ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान दिलं, संसदीय लोशाहीत ५०-५५ वर्ष घालवलीत त्यांच्याविषयी कोणती भाषा भाजपाचे लोक वापरत आहेत,” असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

  • “सत्ताधारी, विरोधकांनी एकत्र काम करायला हवं”

राज्याचे, देशाचे आणि लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी दोन्ही बाजूंनी काम होणं लोकशाहीत महत्वाचं असतं. पण दुर्दैवाने गेल्या सात, आठ वर्षात हे चित्र पहायला मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत, पराकोटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात. हे चित्र देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“राष्ट्राच्या, सुरक्षेच्या तसंच अनेक मुद्द्यांवर जास्तीत जास्त एकमत करुन सभागृहाचं कामकाज पुढे नेलं पाहिजे,” असं मत संजय राऊत यांनी मांडलं आहे. “अनेक मुद्दे निवडणुकीच्या आधी जिवंत केले जातात. हिजाबचा मुद्दाही आला होता. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत असे अनेक मुद्दे अचानक येतात आणि निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न असतो. अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण जोर देत असतो. निवडणुका त्यावरच लढवल्या जातात,” असं राऊत म्हणाले.

  • “गंगेत प्रेतं वाहून गेली तशी लोकंही वाहून जाताना दिसतात”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “निवडणुका झाल्या की विकासावर बोलण्यास सुरुवात होते. पाच वर्षांनी पुन्हा जुन्या मुद्द्यांवर येतो. लोकांनाही आता सवय झाली आहे. गंगेत प्रेतं वाहून गेली तशी लोकंही वाहून जाताना दिसतात. हे चित्र देशासाठी चांगलं नाही. चार राज्यांमद्ये भाजपा आणि एकामध्ये आप जिंकली असून विजयाचं अजीर्ण होऊ नये, सत्कारणी लावावा. या देशात विरोधी पक्ष राहणं या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे”.

  • “मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच, पण…”

सामनामधून मोदींचं कौतुक केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून यासंबंधी सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, “देशाचे पंतधान एका पक्षाचे नसतात हे त्यांना समजायला हवं. त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना गुडघ्यापेक्षा खुजं करुन टाकलं आहे. हे मी आता म्हणत नसून अनेक वर्षांपासून सांगत आहे. मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच आहे, पण भाजपाने त्यांना खुजं करुन टाकलं आहे. ते फक्त आमचेच पंतप्रधान आहेत, आमच्याच पक्षाचे आहेत, पक्षातल्या एका गटाचे आहेत असं वातावरण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी निर्माण केलं असून करतही आहेत”.

  • “पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असून एका पक्षाचं नाही”

“पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असून एका पक्षाचं नाही. पंतप्रधानांची गेली काही भाषणं ऐकली तर त्यांनीही या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं. मी देशाचा नेता आहे असं त्यांनी स्वत:ला बजावलं पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.

“यामध्ये सर्वात जास्त समावेश महाराष्ट्रातील नेत्यांचा आहे. त्यांनाही आपण महाराष्ट्रातील नेते आहोत हे समजलं पाहिजे. पण काही लोकांना मोठेपण मिळालं असेल तर ते टिकवता येत नाही, त्याची प्रतिष्ठा वाढवता येत नाही,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, “पणजीत उत्पल पर्रीकरांचा पराभव झाल्यानंतर भाजपा उमेदवार बाबुश यांनी आपल्या विजयात पक्षाचा सहभाग नसल्याचं सांगितलं. त्यामुळे गोव्यात आमच्यामुळे पक्ष जिंकला असं कधीच होत नाही. पक्षापेक्षा त्या भागातील व्यक्तीचं महत्व असतं. अशा व्यक्तींचं झुंड एकत्र येतं आणि ते सरकार बनवतात”.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button