breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अनुभवसंपन्न, समाजोन्नतीसाठी झटणारे नेतृत्व हरपले!’

कोपरगाव |

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला. नगर जिल्ह्यात कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. सहकार व पाणीप्रश्नांवर नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या रुपाने राज्याने एक जुने-जाणते नेतृत्व हरपल्याची भावना राज्यातील मान्यवर नेत्यांनी कोल्हे श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.

गृहमंत्री दिलीप वळसे – शेती, सहकार आणि प्रामुख्याने साखर क्षेत्राचे अभ्यासक अशी शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. या क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले. शेतकऱ्यांना सहकारातून विकासाचा मार्ग त्यांनी दाखविला. कोल्हे व माझे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध होते. नुकताच त्यांच्याशी पत्ररूपाने हृद्य संवाद घडला होता. या पत्रातील आत्मीयता व सहजपणा आठवून भावना उचंबळून आल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील व्यस्ततेमुळे इच्छा असूनही त्यांची भेट होऊ शकली नाही, याची हूरहूर मनाला आहे. पण आमच्यातील जिव्हाळय़ाच्या आठवणींना या पत्ररूपी भेटीने उजाळा मिळाला. हे अखेरचे पत्र मन:पटलावर कायम कोरलेले राहील.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात– शिस्तप्रिय व अभ्यासू शंकरराव कोल्हे यांनी जिल्हा बँक व जिल्ह्याच्या विकासासाठी कायम साथ दिली. तसेच मंत्रीमंडळात परिवहन, महसूल, उत्पादन शुल्क या खात्यांमध्ये त्यांचे काम दिशादर्शक ठरले. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राज्याच्या राजकारणातील व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले आहे.

आमदार राधाकृष्ण विखे – शेती, सहकार आणी पाणीप्रश्नाचा एक अभ्यासू नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. जिल्ह्यमच्या पाणी प्रश्नाबाबत नेहमीच जागृत आणि आग्रही भूमिका त्यांची होती. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारीही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी होती. कोल्हे यांनी जवळपास ५० वर्षे राजकीय, औद्योगिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम केले. सहकार चळवळ, साखर कारखानदारी आणि कृषी क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. ते स्पष्टवक्ते होते. त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय तसेच सहकार चळवळीची हानी झाली आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख – ‘काळे-कोल्हे’ युग आज संपलं. जुन्या पिढीतील एक कर्तबगार नेतृत्व आपल्यातुन निघुन गेलं आहे. राजकिय संघर्ष, राजकारणातले मतभेद त्यांनी सहकारात व विकास कामात कधी येऊ दिले नाहीत. आजच्या नविन पिढीने त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. नगर जिल्ह्याचा विकासाचा इतिहास जेंव्हा लिहिला जाईल, त्यामध्ये कोल्हे यांचे नाव अग्रभागी असेल.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके -महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवी दिशा देणारे व नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरोगामी नेतृत्वाला शंकरराव कोल्हे यांच्या रुपाने हरपलो आहोत. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व जिल्ह्याच्या जडणघडणीत शंकरराव कोल्हे साहेबांचा मोठा वाटा आहे.

आमदार आशुतोष काळे – ज्या-ज्या वेळी जिल्ह्यात अथवा राज्यात कोपरगावचा विषय येतो त्या-त्या वेळी कर्मवीर शंकरराव काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे या दोन सहकार नेत्यांचे आवर्जून नाव घेतले जाते. एवढे मोठे दैदिप्यमान काम या दोन दिग्गज नेत्यांनी नि:स्वार्थपणे सहकार क्षेत्रात करून ठेवले आहे. एका नावाच्या व एका राशीच्या या दोन शंकररावांनी आदर्श सहकार कसा असावा याची जिल्ह्यात व राज्यात कोपरगावची वेगळी ओळख करून दिली आहे. राजकारण व समाजकारण करीत असतांना जिल्ह्यातील सर्वच घटकांवर काळे व कोल्हे या दोन सहकार रत्नांचे प्रभुत्व होते. कोल्हे यांच्या निधनामुळे दृरदृष्टी असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या रूपाने सहकार क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले.

पद्मश्री पोपटराव पवार – शंकरराव कोल्हे यांचे जिल्ह्याच्या उभारणीत व सहकारात मोठे योगदान होते. अभ्यासू राज्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. स्पष्ट बोलणे व कामाची अंमलबजावणी याबाबत ते दक्ष असत. बीएससी अ‍ॅग्रीह्ण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांना पूर्ण जाण होती. राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांपुढे त्यांचा आदर्श होता. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

माजी मंत्री मधुकर पिचड – राजकारणात व समाजकारणात मोलाचं मार्गदर्शन करणारं अभ्यासू व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. शेती, सहकार, शिक्षण आणि पाणी या शेतकऱ्यांच्या जिव्हाळय़ाचा विषयावर तळमळीने काम करणारा जुन्या पिढीतील नेता हरपला.त्यांनी वसंतदादा पाटील यांना समर्थपणे साथ देऊन राज्यात सहकाराची चळवळ भक्कम करण्याचे काम केले. त्यांनी राज्य साखर संघ व वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटवर काम केले. सत्तेत असतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधानसभेत आक्रमकपणे आवाज उठविला. शेतकऱ्याला चढय़ा दराचे व्याज परवडत नाही म्हणून रिझव्‍‌र्ह बॅंकेवर रुम्हणे मोर्चा काढणारा नेता आपल्यातून निघून गेला. निळवंडे धरणाचे काम वेगाने व्हावे, कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. आपल्या मंत्रिपदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला. अगस्ती कारखान्याच्या उभारणीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

आमदार सुधीर तांबे – सहकारातून सर्व सामान्यांच्या जीवनात नवी पहाट पुलवितांना शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचे कार्य उच्चशिक्षित असलेल्या स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आयुष्यभर केले. त्यांनी सहा वेळा कोपरगांव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले, संजीवनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली. नऊ वर्ष साई संस्थानचे उपाध्यक्ष म्हणून योगदानही दिले.आधुनिक विचारांची जाण असलेले कोल्हे यांच्या निधनाने सहकार व शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक हरपले.

ज्येष्ठ नेते शरद पवार : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. राज्यातल्या कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली ती शंकरराव अप्पांनी. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं. अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला. ग्रामीण विकासासाठी आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांचे गुणविशेष सामाजिक क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगिकारावे असे होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस – शंकरराव कोल्हे यांनी सहकार-शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. पाण्याचे प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने प्रवास आणि त्यातून अनेक विषयांवर विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. अनुभवाचा समृद्ध झरा असलेले हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button