breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मिलिंद तेलतुंबडे कायम ३ स्तरीय सुरक्षेत फिरायचा, असं असतानाही…”, नक्षलवाद्यांवरील कारवाईवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई |

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी त्यांचं अभिनंदन करत कौतुक केलंय. “मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रासह छत्तीसगड, आंध्रप्रदेश नक्षल्यांचा नेता होता. तो कायम ३ स्तरीय सुरक्षेत फिरायचा. असं असतानाही पोलिसांनी त्याचा वेध घेतला आहे,” असं मत यावेळी एकनाश शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच मी लवकरच जखमी जवानांना भेटायला जाणार असल्याचंही नमूद केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “चकमकीत २६ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांची टीमने मिळून २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. ही गेल्या वर्षभरातील देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होतंय. गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून मी देखील गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख व सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात ४ जवान जखमी झालेत. त्यांना तात्काळ नागपूरला हलवण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.”

  • “सर्वात जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेलाही कंठस्नान”

“नागरिकांना, पोलिसांना मारणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर बक्षीसं जाहीर झालेल्या नक्षलवाद्यांवर विशेष कारवाई करण्यात आलीय. यात सर्वात जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा होता. तो महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातील नक्षल्यांचा नेता होता. तो केंद्रीय समितीचाही सदस्य होता. त्याला ३ स्तराचं सुरक्षा कवच होतं. तो कायम या सुरक्षा व्यवस्थेसह फिरत होता. असं असतानाही आपल्या गडचिरोली पोलिसांनी त्याचा वेध घेतलाय. त्याच्यावर राज्यात ५० लाखांपेक्षा अधिकचं बक्षीस होतं. इतर राज्यात देखील त्याच्यावर अनेक बक्षीसं होती.

मिलिंद तेलतुंबडेचा एनकाऊंटर केवळ राज्यासाठी नाही, तर देशातील इतर नक्षलग्रस्त राज्यांनाही धक्का आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “एखादी मोठी कारवाई झाल्यानंतर त्याला काहीवेळी नक्षलवाद्यांकडून प्रत्युत्तर येतं. पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले केले जातात. म्हणून पोलीस सतर्क आहेत. सामान्य नागरिकांच्या जीवालाही धोका पोहचू नये याची काळजी पोलीस घेत आहेत. परिस्थिती सामान्य आहे, चिंता करण्याची गरज नाही. भितीचं वातावरण बिलकुल नाही,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button