breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा आता ईडी, ‘सीबीआय’ची ‘पिडा’?

राजकीय चर्चेला उधाण : शहरातील तीन बड्या नेत्यांच्या हालचाली ‘थंडावल्या’

पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी 

अंमलबजावनी संचलनालय अर्थात ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करुन राजकीय साठेमारी होत आहे, असा आरोप सर्रास विरोधी पक्षांकडून  होताना दिसतो. त्याद्वारे पक्ष आणि सत्ताकारण सुरू असल्याचे पहायला मिळते. हीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमध्येही आगामी काळात पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘हेवीवेट’ नेते आणि आमदार रोहीत पवार यांच्यावर ‘ईडी’च्या कारवाई होणार असे वृत्त समोर आले. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली असून, आता पिंपरी-चिंचवडमधील तीन नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

वास्तविक, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर तपास यंत्रणांद्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांचा राजकीय सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे, रोहीत पवार यांच्याविरोधात राम शिंदे यांना भाजपाने मोठी ताकद दिली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यातून विस्तवही जात नाही. आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिस्पर्धी नेत्याचा ‘बंदोबस्त’ केला तर नवल वाटायला नको, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

दुसरीकडे,  ज्या-ज्या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव आहे. त्या मतदार संघात सत्ताधारी पक्षांकडून चौकशांचा सपाटा लावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला असता, राष्ट्रवादी, शिवसेनेची ताकद भाजपाला आव्हान देण्याइतपत निश्चितच प्रभावी आहे. मात्र, महाविकास आघाडीतील दोन-तीन नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला, तर शहरातील महाविकास आघाडीला धक्का बसेल. त्यामुळे आगमी निवडणुकांची गणिते बिघडतील, असे भाकित राजकीय विश्लेषकांकडून बोलून दाखवले जात आहे.

असे असले तरी, ‘‘आमचा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही. त्यामुळे आम्हा कोणालाही नोटीस आलीच, तर कोणाला काही अडचण येईल. असे काही प्रसंग आले तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ,’’ अशी खंबीर भूमिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे धैर्य वाढताना दिसत आहे. पवार आणि ठाकरे कटुंबियांनी आपल्या नेत्यांच्या बाजुने उभा राहण्याचा निर्धार केल्याचे पहायला मिळत आहे.

‘तो ’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर..?

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तीन मातब्बर नेत्यांचा राजकीय हालचाली पूर्णपणे थंडावलेल्या आहेत. यामध्ये अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात ‘डिसिजन मेकर’ असलेले नेते कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागली असल्यामुळेच तीन बड्या नेत्यांनी राजकीय पटलावरील सक्रीयता कमी झाली आहे. तसेच, लवकरच महाविकास आघाडीतील एक बडा नेता १० माजी नगरसेवकांसह भाजपात जाहीर प्रवेश करणार आहे, असे कुजबूज भाजपाच्या गोटात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या राजकारणात काय उलथापालथ पहायला मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button