breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर”

मुंबई |

मुंबईत पावसाने अक्षऱश: तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. दरड आणि भिंत कोसळल्याने २१ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. दरम्यान राज्यात आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षित आपत्तींचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे आणि दरडग्रस्त भाग व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. “मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..,” अशी टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.

  • विविध दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू

मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. अंधेरीतील फिरदोस बेकरीचा मालक असलेल्या तरुणाचा दुकानातील साहित्य वाचवताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर पोईसर येथील घटनेत एक जण दगावला. वांद्रे रेक्लेमेशन येथे ४५ वर्षांच्या एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

मुंबई आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर ऊन होते. पावसाची फारशी चिन्हे दिसत नव्हती; परंतु रात्री ११ वाजता चित्र बदलले. शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ वाजल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. १२ ते २ या वेळेत मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर येथे काही ठिकाणी सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button